मार्कंडेय हॅास्पिटल मध्ये एका महिलेच्या सिझेरियन प्रसुती नंतर तिची प्रकृती खालावून मृत्यू .
★ महिलेच्या मृत्यू साठी स्री-रोग तज्ज्ञ डॅा.वैशाली चलाख आणि डॅा.प्रशांत चलाख हे जबाबदार असल्याचा आरोप.
■ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा नातेवाईक ची मागणी.
एस.के.24 तास
गडचिरोली : शहरातील मार्कंडेय हॅास्पिटलमध्ये एका महिलेच्या सिझेरियन प्रसुतीनंतर तिची प्रकृती खालावून मृत्यू झाला.याप्रकरणी नातेवाईकांनी चांगलाच रोष व्यक्त केला. त्या महिलेच्या मृत्यूसाठी रुग्णालयाच्या स्री-रोग तज्ज्ञ डॅा.वैशाली चलाख आणि डॅा.प्रशांत चलाख हे जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केली.या संदर्भात त्यांनी पोलिस स्टेशनलाही तक्रार केली आहे.
कविता निलेश कोडापे (मसराम) वय,३८ वर्ष रा.गोकुळनगर असे मृत महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाच्या कर्मचारी असलेल्या कविता यांच्या गरोदरपणा दरम्यान त्यांची नियमित तपासणी मार्कंडेय हॅास्पिटलमध्येच सुरू होती.सर्वकाही सुरळीत असताना दि.६ ला संध्याकाळी त्या नियमित तपासणीसाठी गेल्या असताना आताच भरती करून सिझर करावे लागेल,असे त्यांना डॅा.वैशाली चलाख यांनी सांगितले.घाईने सिझरसाठी नेताना कागदपत्रांवर नातेवाईकांच्या सह्या सुद्धा घेतल्या नाही.यावेळी दोन ते अडीच तास शस्रक्रिया कक्षातून बाहेर आणले नाही.
त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने रक्त देण्याची गरज असल्याचे सांगितले. रात्री ११.३० च्या सुमारास बाहेर आणल्यानंतर रुग्णाची प्रकृती बरी वाटत होती.पण सकाळी पुन्हा पोटात दुखायला लागले. श्वास घेण्यासाठीही त्रास होऊ लागला.त्यामुळे कविता कोडापे यांनी सुविधांनी सुसज्ज असलेल्या डॅा.विवेक आत्राम यांच्या डिव्हाईन हॅास्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय डॅाक्टरांनी घेतला.पण तिथे नेताना प्रकृती आणखी खालावली आणि डिव्हाईन हॅास्पिटलमध्ये काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
डॅाक्टरांच्या चुकीमुळेच मोठा रक्तस्राव होऊन गुंतागुंत वाढली असा आरोप निलेश कोडापे यांच्यासह अमिता मडावी,अमोल कुडमेथे यांनी केला. रुग्णालयात रक्तस्राव थांबवण्याची मशिन,आॅक्सिजन, व्हेंटिलेटर, सुसज्ज रुग्णवाहिका,पार्किंगची सोय नसताना अशा रुग्णालयांना परवानगी कशी मिळते,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्यामुळे सदोष मनुष्यवधासह रुग्णालयाची नोंदणी रद्द करा,नुकसानभरपाई द्या,जन्मलेल्या मुलीची जबाबदारी घ्या,अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी बरेच नातेवाईक,शेजारी उपस्थित होते.