आमदार - खासदार यांना ७ डिसेंबर पासून गावबंदी कशासाठी ?
एस.के.24 तास
चंद्रपूर : सोन्याची कुऱ्हाड असलेला विदर्भ गरीब का झाला,असा प्रश्न विचारून पालकमंत्री तथा सर्व पक्षीय खासदार,आमदारांना ७ डिसेंबरपासून गावबंदी करण्यात येत आहे,अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.
महाराष्ट्रात २ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.त्यापैकी विदर्भातील ७० टक्के म्हणजे १ लाख ४० हजार शेतकरी आहेत. महाराष्ट्रातील २७०३ ओसाड गावांपैकी विदर्भांत ८५ टक्के म्हणजे २३०५ गावे ओसाड आहेत.पुण्या-मुंबईकडे विदर्भातील मुले नोकरीला जात असल्याने लोकसंख्या कमी होऊन ६६ ऐवजी ६२ विधानसभा मतदारसंघ राहिले आहेत.महाराष्ट्राने विदर्भाला भकास बनवले आहे,असा आरोप चटप यांनी केला.
यावेळी जांबुवंतराव विचार मंचाच्या अध्यक्ष, ज्वाला धोटे यांनी विदर्भासाठी संविधान हाती घ्यायला तयार असल्याचे सांगितले.विदर्भ महा जागरण चे नितीन रोंघे यांनी उपमुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य काळात सर्वात कमी सिंचन अनुशेष भरल्याचा आरोप केला.नागविदर्भ आंदोलन समितीचे सरचिटणीस अहमद कादर यांनी विदर्भ संयुक्त कृती समितीतर्फे अधिवेशनावर ११ डिसेंबर रोजी १० हजार लोकांचा मोर्चा काढणा असल्याची माहिती दिली.
या पत्रपरिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार,महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे,युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर,ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तुनवार, कोअर कमेटीचे सदस्य,तात्यासोहब मते,ज्योती खांडेकर, रेखा निमजे, आदी उपस्थित होते.