अर्जुनी मोरगाव तालुक्यात रानटी हत्तींचा मुक्काम ; शेतकऱ्यांची चिंता वाढली.

अर्जुनी मोरगाव तालुक्यात रानटी हत्तींचा मुक्काम ;  शेतकऱ्यांची चिंता वाढली.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तीच्या कळपाने गेल्या पाच दिवसांपासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कालीमाती, बोळदे परिसरातील शिवारात मुक्काम ठोकला आहे.परिणामी,या परिसरातील शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली असून हत्तीच्या कळपाच्या दहशतीखाली या परिसरातील शेतकरी असल्याचे चित्र आहे.


अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कवठा बोळदे, बाराभाटी, नवेगावबांध,केशोरी,रामपायली, इटियाडोह या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून रानटी हत्तीच्या कळपाने मोठ्या शेतशिवारात धुमाकूळ घालून धान पिकांचे नुकसान केले.


 दोन-तीन घरांची आणि धान्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याने योगेश्वर उईके यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दोन दिवसांपूर्वी हत्तीच्या कळपाने या परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलाच्या दिशेने धाव घेतली होती. 


त्यामुळे हे हत्ती गडचिरोली जिल्ह्यात परत जातील, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कालीमाती, कवठा बोळदे परिसरातील शेतशिवारातच मुक्काम ठोकला आहे. या रानटी हत्तीच्या कळपावर वनविभागाचे पथक नजर ठेवून आहे.


ड्रोन च्या मदतीने हत्तीच्या कळपाचे लोकेशन सातत्याने ट्रेस केले जात आहे : - 


रविवारी सकाळी या हत्तीच्या कळपाचे लोकेशन हे कालीमाती शेतशिवारात आढळल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वन विभागाच्या आठ-दहा कर्मचाऱ्यांची चमू आणि एक विशेष पथक याच परिसरात तैनात करण्यात आले आहे.हे पथक हत्तीच्या कळपाचे लोकेशन घेऊन परिसरातील गावकऱ्यांना सजग राहण्याच्या सूचना देत आहेत. हत्तीच्या कळपाचा मुक्काम या परिसरात वाढल्याने शेतकऱ्यांची काळजी मात्र वाढली आहे.


मळणी ची कामे आटोपण्याचा प्रयत्न : - 


रानटी हत्तींच्या कळपाने शेतातील धानाच्या पुंजण्यांना टार्गेट केले आहे. हा कळप शेतशिवारात धुमाकूळ घालून धानाचे नुकसान करीत आहे. या भीतीने शेतकरी आता धानाच्या मळणीची कामे लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाय शेतीची कामेही दुपारी चार वाजतापर्यंत करून शेतकरी घराकडे परतत आहे.


नुकसानी चे पंचनामे सुरू : - 

रानटी हत्तीच्या कळपाने मागील पाच दिवसांपासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चार ते पाच गावातील शेतशिवारात धुमाकूळ घालून धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानीचे वनविभागाचे कर्मचारी पंचनामे करीत आहे. हत्तीच्या कळपाने किती हेक्टरमधील पिकांचे नुकसान केले याचा अहवाल सोमवारी येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !