वांगेतुरी मध्ये अवघ्या २४ तासांत उभारले पोलीस ठाणे ; गडचिरोली पोलिसांची विक्रमी कामगिरी.
एस.के.24 तास
एटापल्ली : नक्षलवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभागातील अतिदुर्गम वांगेतुरी येथे केवळ २४ तासांत नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली.अतिसंवेदनशील परिसर असल्याने येथे गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील,पोलीस अधीक्षक नीलोत्पल,केंद्रीय राखीव बल १९१ बटालियनचे कमान्डंट सत्यप्रकाश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस व पोस्टे वांगेतुरीचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी महेश विधाते उपस्थित होते.
पोलीस स्टेशनच्या उभारणीसाठी १ हजार ५०० मनुष्यबळ, १० जेसीबी, १० ट्रेलर, ४ पोकलेन, ४५ ट्रक काम करीत होते.पोलीस ठाण्यामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा,२० पोर्टा कॅबिन,जनरेटर शेड,पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट,मोबाईल टॉवर,टॉयलेट सुविधा, पोस्ट जवानांच्या सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली.तत्पूर्वी तोडगट्टा येथे वाद झाल्याने त्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी वांगेतुरी, हेडरी,गट्टा जांबिया व संपूर्ण एटापल्ली तालुक्यात पुढच्या १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू केली आहे.
यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थितांना संबोधितांना सांगितले की, गडचिरोली पोलीस दल नेहमीच गडचिरोलीच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहीला आहे. त्याचाच एक परिपाक म्हणून नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. गडचिरोली पोलीस दल या माध्यमातून गडचिरोली च्या जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर असेल, असा आशावाद व्यक्त केला. ग्रामस्थांनी माओवाद्यांच्या खोट्या कथनाने प्रभावित होऊन त्यांच्या भरकटलेल्या क्रांतीला बळी पडू नये.
नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीणमध्ये महत्वाची भूमीका बजावेल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केले.