डॉक्टर ला चहा - बिस्कीट न मिळाल्याने ते शस्त्रक्रिया न करता निघून गेले.
★ चक्क डॉक्टर चा प्रताप...डॉक्टर ची चौकशी होणार.
एस.के.24 तास
नागपूर : मौदा तालुक्यातील खात प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिला शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होत्या.परंतु डॉक्टरला चहा-बिस्कीट न मिळाल्याने तो शस्त्रक्रिया न करता निघून गेला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून या प्रकरणाची तीन सदस्यीय समिती चौकशी करणार आहे.डॉ.तेजराम भलावे,असे तक्रार झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
नागपूर जिल्ह्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी डॉ.भलावे हे आठ महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणार होते. यातील चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली.
त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी चार महिलांना त्यांनी भूलसुद्धा दिली. परंतु,या दरम्यान वेळेवर चहा न मिळाल्याने डॉ.भलावी हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाहेर पडले ते परतलेच नाहीत. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या चार महिला तशाच ताटकळत राहिल्या.या असंवेदनशील प्रकारावरून संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांनी दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था केली. उपाध्यक्षा तथा आरोग्य समिती सभापती कुंदा राऊत यांनीही या प्रकाराला गांभीर्याने घेत संबंधित प्रकरणात विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. मधुमेह असून आपल्याला वेळेवर चहा - बिस्किटे लागतात. ती न मिळाल्याने आपल्या रक्तशर्कराचे स्तर खालावले व आपला रक्तदाबही खालावला. त्यामुळे आपल्याला तेथून काढता पाय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण डॉ.भलावी यांनी वरिष्ठांना दिल्याचे समजते.