गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल ; म्हणाले,पुतण्याला. ★ ५ कोटी धनगर भुजबळांच्या पाठिशी.

गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल ; म्हणाले,पुतण्याला.


★ ५ कोटी धनगर भुजबळांच्या पाठिशी.


एस.के.24 तास


जालना : जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना भाजपाचे आमदार, गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. तुम्ही गरीब मराठ्यांवरती अन्याय करण्याचं काम केलं. नात्यात, मुलांना आणि पुतण्याला साखर कारखाने दिले आणि गरीब मराठा समाजाच्या हातात ऊसाचा कोयता दिला, अशी टीका गोपीचंद पडळकरांना शरद पवारांवर केली आहे. या सभेला मंत्री छगन भुजबळ,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रासपचे नेते महादेव जानकर आणि ओबीसी नेते उपस्थित होते.


गोपीचंद पडळकर म्हणाले, “ महाराष्ट्रात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे.गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची सर्वांची आहे. पण, ३४६ जातींचा समावेश असलेल्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही आमची भूमिका आहे. अनेक जातींना ओबीसी आरक्षणाचा लाभ झाला नाही. अनेक जाती ओबीसी आरक्षणापासून वंचित आहेत. अनेक जातींना ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचही होता आलं नाही. आमदार आणि खासदारकी हा लांबचा विषय आहे.”


५ कोटी धनगर भुजबळांच्या पाठिशी : - 

“ओबीसींवरती अन्याय करण्याची कुणी भूमिका घेत असेल, तर महाराष्ट्र पेटून उठेल. ‘प्रस्थापितांना देऊ उत्तर, कारण ओबीसी शंभरात आहे सत्तर.’ छगन भुजबळांच्या भूमिकेच्या पाठिशी आम्ही सर्वजण उभे आहोत. भुजबळांनी घाबरायचं काम नाही. ५ कोटी धनगर समाज तुमच्या पाठिशी आहे,” असा विश्वास गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केला.


“ मराठा समाजाचा नेमका शत्रू कोण आहे ? ”

“ मराठा समाजाची वाताहत ओबीसींनी केली का ? मराठा समाजाचा नेमका शत्रू कोण आहे? मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसींचा विरोध नाही. तुम्ही गरीब मराठ्यांवरती अन्याय करण्याचं काम केलं. नात्यात,मुलांना आणि पुतण्याला साखर कारखाने दिले.गरीब मराठा समाजाच्या हातात ऊसाचा कोयता दिला. त्यांची मुलं तुमच्याकडे नोकरी मागण्यासाठी आली, तेव्हा ४० लाख रूपये संस्थाचालकांनी मागितले,” असं म्हणत पडळकरांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !