म्हातारदेवी ग्रामपंचायत कडून बांधकामाची परवानगी न घेणाऱ्या लॉयड मेटल्सच्या निवासी वसाहतीचे बांधकाम थांबवले.
★ अनधिकृत बांधकाम,जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
एस.के.24 तास
चंद्रपूर : कुठलीही अधिकृत परवानगी न घेता घुग्घुस येथील लॉयड मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीने ९० गाळ्यांची निवासी वसाहत उभारण्याचे सुरू केलेले काम जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तत्काळ प्रभावात थांबवले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या या दणक्याने लॉयड मेटल्सचे धाबे दणाणले आहेत.परिणामी लॉयड व्यवस्थापना कडून बांधकाम परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले जात आहे.
म्हातारदेवी ग्रामपंचायतीकडून बांधकामाची परवानगी न घेता घुग्घुस येथील लॉयड मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीने ९० गाळ्यांची निवासी वसाहत उभारण्याचे काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हातारदेवी ग्रामपंचायतीने या बांधकामाबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर कंपनीने १५ नोव्हेंबर रोजी साधे पत्र देऊन तसेच पैसे भरून बांधकामाची परवानगी मागितली. लॉयड मेटल्सने नियम धाब्यावर बसवून सुरू केलेल्या कामामुळे ग्रामस्थ चांगलेच संतापले.
या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. दरम्यान, लॉयड मेटल्सच्या या अरेरावीपणाची दखल जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तत्काळ प्रभावात घेतली. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय बांधकाम सुरू असल्याची बाब निदर्शनास येताच जिल्हाधिकारी गौडा यांनी बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतरच हे बांधकाम थांबवण्यात आले आहे. दरम्यान, या बांधकामाची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी गौडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लॉयडने विनापरवानगी सुरू केलेले बांधकाम थांबवले असल्याची माहिती दिली.चंद्रपूर चे उपविभागीय अधिकारी मुरूगुनाथन या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.