विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेंकडून दखल ; डान्स हंगामात आक्षेपार्ह व्हिडीओ.
एस.के.24 तास
तुमसर : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे मंडई निमित्त आयोजित डान्स हंगामा कार्यक्रमात डान्स हंगामा गृपच्या तरुणीने विवस्त्र डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. या आक्षेपार्ह व्हिडीओची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून देखील गंभीर दखल घेण्यात आली असून विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत घटनेची सखोल चौकशी करत पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे दिले निर्देशही नीलम गोऱ्हे यांनी दिले.
संगीत,नृत्य हा कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग आहे. परंतु, ज्या प्रकारे याचे व्यापारीकरण होऊन नाचणाऱ्या स्त्रियांना विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणे आणि मग पैसे उधळले जाणे हा जो निंदनीय प्रकार नाकडोंगरी येथे घडलेला आहे. ती केवळ एक घटना नसून तो गंभीर गुन्हा असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले. कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलेला विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणे हा गुन्हा मानला गेला पाहिजे.
तसेच रात्रीच्या वेळेला अशा प्रकारे लोकांची गर्दी जमते आणि स्त्रियांना विवस्त्र करते, यामध्ये नोटा उधळल्या जातात जेणेकरून त्यांनी अश्लील हावभाव करत नाचावं त्यामुळे कायद्याचा भंग झालेला आहे. यामध्ये राजकीय नेते सुद्धा सापडलेले आहेत. ही निषेधार्ह आणि चिड आणणारी घटना आहे. या प्रकरणात कडक कारवाई करणे आवश्यक आहे. यामध्ये पोलिसांनी एक व्यवस्थित नियमावली तयार करणे आवश्यक आहे, अशा सूचना गोऱ्हे यांनी केल्या आहे.
सामान्य लोकांचा सहभाग ज्या कार्यक्रमात असतो त्यावेळेस अशा पद्धतीने महिलांचं लैंगिक शोषण करण किंवा त्यासारखे गुन्हे करणं हे अत्यंत लाजिरवाणे आहे.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा सामाजिक भान आणि कायद्याची बुज राखली गेली पाहिजे,असे डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.