मित्रां सोबत वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळी साठी गेलेल्या कुनघाडा (रै.) येथील युवकाचा बुडून मृत्यू.
विशाल बांबोळे - कार्यकारी संपादक
चामोर्शी : मित्रां सोबत वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळी साठी गेलेल्या कुनघाडा (रै.) येथील युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी ११.३० ते १२ वाजता च्या दरम्यान वैनगंगा नदी पात्रात घडली.करण गजानन गव्हारे वय,२६ रा. कुनघाडा (रै.) असे मृत युवकाचे नाव आहे.
नाव व बोटच्या माध्यमातून शोधमोहीम चालवुनही प्रेताचा पत्ता लागला नसून पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील शोधमोहीम सुरू आहे.
माहितीनुसार१० ते १२ वर्गमित्र एकत्र जमून कुनघाडा (रै.) ते डोनाळा वैनगंगा नदी घाटावर आंघोळी साठी गेले होते.त्यापैकी तीन युवक नदीपात्रात उपलब्ध असलेल्या नावेवर बसून नाव चालविण्यात मग्न होते. नाव पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाऊन डुबण्याच्या स्थितीत असतांना तिन्ही युवक पाण्याच्या खाली उडी मारून कसेबसे बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा मृत करण गव्हारे हा खोल पाण्याच्या बाहेर होता.
मात्र एक मित्र बुडत असल्याचे समजताच मृत करणने पाण्यात उडी मारून पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने गेला मात्र त्याला पाण्याचा अंदाज घेता आला नाही. पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू असल्यामुळे त्याला पाण्याच्या बाहेर पडता आले नाही. व तो पाण्यातच बुडून राहिला. प्रेताचा शोध घेण्यासाठी प्रथम नाव सोडण्यात आले. मात्र प्रयत्न असफल ठरले नंतर बोटच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू करण्यात आली. दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शोधमोहीम चालली. मात्र अद्यापही प्रेताचा पत्ता लागलेला नाही.पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन समिती चमू यांच्या अथक परिश्रमात शोधमोहीम सुरू आहे.
सदर घटनास्थळी पोलीस पाटील,दिलीप श्रुंगारपवार, तलाठी नितीन मेश्राम,कोतवाल नेताजी वाघाडे व मृतकाचे नातेवाईक हजर होते.