मरेगाव (चांभार्डा) येथील शेतकरी रानटी हत्तींनी घेतला बळी.
एस.के.24 तास
गडचिरोली : धान पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी रानटी हत्तींना जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला.बाजूला दबा धरून बसलेल्या हत्तीने रस्त्यावर शेतकऱ्यास चिरडून ठार केले.ही घटना तालुक्यातील मरेगाव जवळ २५ नोव्हेंबर ला रात्री ८ वाजता घडली.मनोज प्रभाकर येरमे वय,३८ रा.मरेगाव असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
चांभार्डा व मरेगाव परिसरात गेल्या १० दिवसांपासून रानटी हत्तींचा धुडगूस सुरू आहे. यातच आपल्या पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी मनोज येरमे हे शनिवारी सायंकाळी अन्य शेतकऱ्यांसह शेताकडे गेले होते.दरम्यान वडधा -मौशिखांब मार्गालगतच रानटी हत्तींचा कळप वावरत होता.याच वेळी येरमे हे सायकलने घराकडे परत येत असतानाच हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला व डांबरी रस्त्यावरच त्यांना चिरडले.यात येरमे यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला.चांभार्डा व मरेगाव भागात हत्तींनी गेल्या आठवडाभरापासून अक्षरश: धुडगूस घातला असून शेकडो शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
तीन महिन्यात तिसरा बळी : -
रानटी हत्तींनी गेल्या तीन महिन्यात तिघांचा बळी घेतला.यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी आरमोरी तालुक्याच्या पळसगाव परिसरात सहायक वनसंरक्षकांचे वाहन चालक सुधाकर आत्राम यांना तर १७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील होमाजी गुरनुले या शेतकऱ्याला हत्तीने चिरडून ठार केले होते. त्यानंतर आता मरेगाव येथे मनोज येरमे यांना हत्तीने चिरडून ठार केले.