राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रचारक पुरस्काराने प्रबोधनकार चेतन ठाकरे सन्मानित.
एस.के.24 तास
अमरावती : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी यांच्या वतीने दरवर्षी समाज कार्यासाठी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्या-यांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रचारक पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी इतर मान्यवरांसोबत गडचिरोली जिल्ह्यातील प्रबोधनकार चेतन ठाकरे यांची भारुड या लोककलेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याबद्दल सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
व्यवसायाने शिक्षक असून सुद्धा सुट्टीच्या दिवशी तसेच फावल्या वेळेचा सदुपयोग करून ते गावखेड्यात जाऊन राष्ट्रसंतांच्या विचारांद्वारे लोकजागृतीचे काम करतात हे विशेष. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्ताने गुरुकुंज मोझरी जि.अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य भरातून आलेले गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.