कोरची तालुक्यातील झेंडेपार लोहाखाणीविरोधात नक्षलवाद्यांची पत्रकबाजी.
★ एक हजार हेक्टरवर उत्खनन करण्याच्या डाव असल्याचा दावा.
एस.के.24 तास
कोरची : झेंडेपार लोहखाणीसाठी केवळ ४६ हेक्टरवर उत्खनन करणार असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. मात्र, त्यांना या परिसरातील एक हजार हेक्टरवर खाण सुरू करायची आहे. यामुळे त्याभागातील पर्यावरण धोक्यात येणार असून या खाणीला आमचा विरोध असल्याचे नक्षलवाद्यांनी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे.समाज माध्यमावर सार्वत्रिक झालेल्या या पत्रकात नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरो प्रवक्ता,श्रीनिवास याचे नाव आहे.
उत्तर गडचिरोलीतील कोरची तालुक्यात येत असलेल्या झेंडेपार टेकडीवरील लोहखाणीत उत्खननाच्या परवानगीसाठी १० ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणविषयक जनसुनावणी पार पडली. यावेळी कोरची तालुक्यातील ग्रामसभा आणि स्थानिकांनी विरोध दर्शवला होता.त्यांच्या समर्थनार्थ आता नक्षलवाद्यांनी पत्रक काढले आहे.यात खाणीमुळे पारंपरिक जंगल नष्ट होऊन त्यावर अवलंबून असलेल्या आदिवासींचे जीवन सुध्दा धोक्यात येईल, परिसरातील धार्मिकस्थळ यामुळे प्रभावित होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.प्रशासन कागदोपत्री ४६ हेक्टरवर हे उत्खनन होणार असल्याचे जाहीर करत आहे.
मात्र हे खोटे असून पोलीस बाळाच्या वापर करून एक हजार हेक्टरवर उत्खनन करण्याचा प्रशासनाचा डाव आहे. यासाठी त्याभागातील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येणार आहे.सूरजागडमध्ये हेच सुरू आहे.येत्या काळात पूर्ण जिल्ह्यात खाणी सुरू करण्याचा कार्पोरेट कंपन्यांचा डाव आहे.त्यामुळे खाणविरोधी आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे नक्षल्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
उत्तर गडचिरोलीत नक्षलवादी सक्रिय : -
गडचिरोली पोलीस दलाने मागील काही वर्षात केलेल्या धडक कारवायांमुळे जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे.मात्र, नक्षल्यांनी पत्रकात हा दावा खोटा असल्याचे सांगून उत्तर गडचिरोलीत आम्ही सक्रिय असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डोके वर काढल्याचे चित्र आहेत.