चंद्रपूर वीज केंद्रातील वाघावर वनविभागाची कॅमेराद्वारे नजर.
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघाने अनेकांना दर्शन दिले. कॉलनी परिसरात फिरणाऱ्या या वाघाचा व्हिडिओ समाज माध्यमावर सार्वत्रिक झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने दुर्घटना होऊ नये या उद्देशातून उपाययोजना म्हणून परिसरात कॅमेरे लावून वाघावर पाळत ठेवली जात आहे. तसेच येथे वन कर्मचाऱ्यांची गस्त लावण्यात आली आहे.
वनपरिक्षेत्राधिकारी जी.आर. लनायगमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन लगत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या वीज केंद्र परिसरात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात येथे अनेकांचा बळीही गेला आहे. त्यानंतर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत पोस्टर, बॅनर लावून जनजागृती करण्यात आली होती. तसेच वीज केंद्र परिसरातील झुडपी जंगल देखील साफ करण्यात आले होते.मात्र, गुरुवारी रात्री ११.४५ वाजता पुन्हा एकदा वीज केंद्र परिसरात पट्टेदार वाघ दिसून आला आहे.
हा वाघ रस्ता ओलांडून प्लांट च्या दिशेने जात असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्याच वेळी एक मोटारसायकल स्वार आणि कार चालक तिथून जात आहे. यातील कार चालकाने हा व्हिडिओ चित्रित केला आहे. तेव्हा वीज केंद्र परिसरातून रात्री, बेरात्री जाताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.या घटनेनंतर वनविभागाकडून परिसरात जनजागृती केली जात आहे. रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे कापणे व अन्य उपाययोजनांसंदर्भात वीज केंद्र व्यवस्थापनाशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती वनपरिक्षेत्राधिकारी.जी.आर.नायगमकर यांनी दिली.