एस.के.24 तास
गडचिरोली: राज्यभरातील शासकीय रुग्णालयात मृत्यूंचे तांडव सुरू असताना गडचिरोली जिल्हा देखील लागोपाठ झालेल्या माता मृत्यूने हादरला आहे. महिला व बाल रुग्णालयात ‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर अत्यवस्थ झालेल्या तिसऱ्या महिलेचा देखील मंगळवारी रात्री नागपुरातील मेडिकल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा.आष्टी) असे मृत मातेचे नाव असून मुलगी सुखरूप आहे. यापूर्वी दोन मातांचा अशाचप्रकारे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
२४ सप्टेंबरला महिला व बाल रुग्णालयात रजनी प्रकाश शेडमाके वय,२३ रा.भानसी,ता.सावली ,जि.चंद्रपूर व उज्ज्वला नरेश बुरे वय,२२ रा.मुरखळा चक, ता.चामोर्शी(हल्ली मुक्काम इंदिरानगर, गडचिरोली), वैशाली सत्यवान मेश्राम वय,२४ रा.आष्टी यांना प्रसूतीसाठी भरती करण्यात आले होते.
तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी तिघींची शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती करण्यात आली.मात्र, रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला,तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला ताप आणि अतिसाराची लागण झाली.
प्रकृती खालावल्याने २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.परंतु संध्याकाळी रजली शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला नागपूरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला.दरम्यान, नागपूरला नेण्यात येत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास आरमोरीजवळ उज्ज्वला बुरे हिनेही प्राण सोडला.तर वैशालीचा ३ ऑक्टोंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला.तिघीं चेही बाळ सुखरुप आहेत.
परंतु आईविना पोरके झाले आहेत.डॉक्टरां च्या हलगर्जीपणामुळे तीन मातांना जीव गमवावा लागल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे.या घटनेमुळे गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थे विषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहे.या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती गठीत केली आहे.