झाडीबोली साहित्य मंडळाचा वर्धापन दिन कविसंमेलनाने साजरा.
एस.के.24 तास
चंद्रपूर : येथील झाडीबोली साहित्य मंडळ शाखेच्यावतीने नुकताच झाडीबोली साहित्य मंडळाचा वर्धापन दिन दाताळा येथील संत खप्तीनाथ महाराज मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीतार्य बंडोपंत बोढेकर होते.अतिथी म्हणून नशाबंदी मंडळाचे,संदीप कटकूरवार,नामदेव गेडकर, बंडू टेकाम, डॉ.धर्मा गावंडे,कार्तिक चरडे,कवयित्री रोहिणी चरडे,मंजूषा खानेकर,संत खप्तीनाथ मंदिराचे पांडे उपस्थित होते.
सुरुवातीला राष्ट्रसंत व ज्येष्ठ लेखक व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यवनाश्व गेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रास्ताविकात प्रा. मोरे यांनी साहित्यिक गेडकर यांच्या आत्मकथन असा मी घडत गेलो, व्यक्तिचित्रण स्मरणातली निरंजना तर कथासंग्रह स्मृतिसुगंधाची गुंफण या त्यांच्या ग्रंथांचा परिचय देऊन त्यांच्या लेखनात राष्ट्रसंतांचा प्रभाव असल्याचे सांगितले.
ग्रामगीतार्य बोढेकर यांनी झाडीबोलीचा वर्धापनदिन झाडीबोलीचे अध्वर्यू डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांचा जन्मदिवस व राष्ट्रसंत यांच्या स्मृतिदिनी साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. यापुढे झाडीबोली विकासासाठी चंद्रपूर शाखा नित्यनेमाने विविध उपक्रम राबविणार असल्याचेही मत मांडले. साहित्यिक यवनाश्व गेडेकर विविध साहित्य मंडळाचे पदाधिकारी असून ते राष्ट्रसंत साहित्य परिषद व नक्षत्राचं देणं या काव्यमंच संस्थेशी जुळलेले होते. बोढेकर पुढे म्हणाले, लेखकांनी पुस्तकरुपाने साहित्य लेखन केले पाहिजे.पुस्तक लेखनाने साहित्यिक अमर राहत असतो.आज गेडेकर जरी नसले तरी साहित्यरूपाने जिवंत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
नामदेव गेडकर यांनीही गेडकर यांच्याबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या.याबनिमित्ताने कविता व राष्ट्रसंत भजन गायनाचा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे संचालन प्रा. नामदेव मोरे तर आभार प्रदर्शन धर्मा गावंडे यांनी केले.