ज्येष्ठ लेखक यवनाश्व गेडकर यांचे निधन : झाडीबोली साहित्य मंडळाद्वारे श्रद्धांजली अर्पण.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शहरातील ज्येष्ठ लेखक तथा सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरिक्षक यवनाश्व गेडकर यांचे दिर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
यवनाश्व गेडकर हे मुळचे चोरा (गुळगाव)येथील असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक पदापर्यंत झेप घेतली होती. पोलीस विभागात असताना त्यांनी अनेक गुन्हे शोधून काढले होते. गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर त्यांची प्रचंड दहशत होती. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःला लेखन कार्यास जोडून घेतले होते.
आणि असा मी घडत गेलो (आत्मकथन), स्मरणातली निरंजना(व्यक्ति चित्रण), स्मृती सुगंधाची गुंफण (कथा संग्रह) हे ग्रंथ प्रकाशित असून ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, झाडीबोली साहित्य मंडळ आणि नक्षत्राचं देणं काव्यमंच या साहित्य संस्थाचे सक्रिय सदस्य होते. त्यांच्या लेखनकृतीस झाडीबोली साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जुनासुर्ला येथे भरलेल्या झाडीबोली साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार ते सातत्याने करीत असे.
संत खप्तीनाथ महाराज मंदिरात आयोजित झाडीबोली साहित्य मंडळाच्या सभेत दिवंगत यवनाश्वजी गेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यवनाश्वजी गेडकर यांनी सामाजिक तथा साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.त्यांनी आपल्या ग्रंथात लिहिलेले स्वानुभव वाचनीय असून त्यांच्या रूपाने आम्ही एक उत्तम लेखक हरवून बसलो आहे, अशी शोकसंवेदना झाडीबोली साहित्य मंडळाचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी डॉ.धर्मा गांवडे,प्रा.नामदेव मोरे,कवी शिवशंकर घुगुल,नामदेव गेडकर,कार्तिक चरडे,बंडू टेकाम गुरूजी,कवयित्री श्रीमती रोहिणीताई मंगरूळकर,मंजूषा खानेकर, नशाबंदी मंडळाचे संदीप कटकुरवार, खप्तीनाथ महाराज मंदिराचे श्री.पांडे आदींची उपस्थिती होती.