एस.आर.एम.समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती दिन संपन्न.
एस.के.24 तास
चंद्रपूर : चंद्रपूर पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य सुनील साकुरे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर उपस्थित होते. महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार,प्रा.डॉ.नरखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनाकार्यावर सविस्तर माहिती दिली.राष्ट्रसंताचे साहित्य विद्यार्थ्यांनी अभ्यासावे. त्यातून प्रेरणा घेऊन ग्रामसुधारणेच्या कार्यात योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाच्या वतीने आजवर अनेक गावांमध्ये निवासी ग्रामीण शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने प्राचार्य डॉ सुनिल साकुरे यांचा बंडोपंत बोढेकर यांनी सत्कार केला.तसेच संदीप कटकुरवार यांनी व्यसनमुक्तीची शपथ उपस्थित विद्यार्थ्यांना देऊन नशाबंदी मंडळाच्या कार्याचे पत्रके वाटली.महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या राष्ट्रसंताच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण प्राचार्य डॉ.साकुरे आणि ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.