वाहनाच्या धडकेत काळवीट चा मृत्यू ; गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील घटना.
गोंदिया : गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया-गोरेगावदरम्यान कारंजा येथील एच.पी.पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलाडताना एका काळवीटला अज्ञात वाहनाने धडक दिली.यात काळवीटचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
गोंदिया - कोहमारा या मार्गावरून प्रवास करीत असलेल्या गोंदियातील बेळगे कुटुंबीयांनी ही माहिती ‘ हिरवळ ’ संस्थेचे पक्षीमित्र रुपेश निंबार्ते यांना दिली. त्यांनी या घटनेबद्दल वनविभागाचे गोंदिया वन परिक्षेत्र अधिकारी आकांक्षा भालेकर यांना कळविले.त्यांनी वनविभागाचे क्षेत्र सहायक कडू व वनरक्षक,काळबांधे या दोघांना तत्काळ घटनास्थळी पाठविले.तो पर्यंत काळवीटचा मृत्यू झाला होता.
या मार्गावर यापूर्वी ही अशाप्रकारच्या अपघातांत अनेक वन्यप्राण्यांचा जीव गेला आहे.५० टक्क्यांपेक्षा जास्त वनक्षेत्र असलेल्या आणि व्याघ्रप्रकल्प असलेल्या जिल्ह्यात वन्यप्राण्यांवर उपचारासाठी प्राथमिक केंद्र नाही. यामुळे गोंदिया जिल्ह्यात आणि नवेगाव धरण परिसरात प्राथमिक उपचार केंद्रे तातडीने उभारावी,अशी मागणी निंबार्ते यांनी केली आहे.