कारची दुचाकीला धडक युवक ठार ; दसऱ्याच्या दिवशी दुर्घटना.
एस.के.24 तास
बुलढाणा : दसरा व धम्मप्रवर्तन दिनाची धामधूम सुरू असताना बुलढाणा चिखली राज्यमार्गावर झालेल्या अपघातात एक युवक ठार तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला.चिखली बुलढाणा राज्य महामार्गावरील केळवद नजीक आज मंगळवारी ( दि २४) दुपारी ही दुर्घटना घडली.
गंभीर जखमी युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी शाहू परिवाराचे संदीप शेळके यांनी मदत केल्याने त्याच्यावर वेळीच उपचार झाले. चिखली तालुक्यातील शिरपूर येथील दोन तरुण दुचाकीने बुलढाणाकडे येत होते.दरम्यान केळवद जवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी बाजूला फेकल्या गेली.
कारदेखील रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. अपघातात २० वर्षीय तेजस कैलास हिवाळे याचा जागीच मृत्यू झाला.
त्याच्यासोबतचा सार्थक सुनील हिवाळे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.