सडक अर्जुनी चे वन परिक्षेत्राधिकारी जाधव व क्षेत्र सहाय्यक पठाण निलंबित ; अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी.
एस.के.24 तास
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव व शेंडा क्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक एफ.एस.पठाण यांच्यावर अवैध वृक्षतोड प्रकरणी चौकशी नंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपवनसंरक्षक जयरामगौडा आर.व नागपूर प्रादेशिक कार्यालयाने २० ऑक्टोबर रोजी केली.या कारवाई मुळे वन विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार सात आठ महिन्यांपूर्वी सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील शेंडा क्षेत्रातील वन कक्ष क्रमांक ६७६ (संरक्षित वन) १७२ (राखीव वन) ६८८, ७०३, ६८१ व ६७१ (संरक्षित वन) मध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ४५ वृक्षांची अवैध वृक्षतोड करण्यात आली होती. या वृक्षांची किंमत ४ लाख ८ हजार २०० रुपये आहे.
तर यापैकी १६ नग म्हणजे ५४ हजार ६९१ रुपयांचे लाकूड वन परिक्षेत्र अधिकारी जाधव,क्षेत्रसहायक एस.एफ. पठाण यांनी जप्त केले होते.पण या प्रकरणात वृक्षतोड करणाऱ्यांना अभय देत व एकूण वृक्षतोड केलेला पूर्ण लाकूडफाटा जप्त न केल्याचा त्यांच्यावर ठपका होता.
यात शासनाचे ३ लाख ५३ हजार ५३४ रुपयांचे नुकसान झाले.या प्रकरणाची काही गावकऱ्यांनी तक्रार केली होती.या तक्रारी च्या अनुषंगाने वन विभागाने चौकशी केली.चौकशीत ही बाब स्पष्ट झाल्याने उपवनसंरक्षक,जयरामगौडा आर.यांनी शुक्रवारी २० ऑक्टोबरला सडक अर्जुनी चे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव व क्षेत्र सहाय्यक एस.एफ.पठाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत दोघांना मुख्यालय उपवनसंरक्षक गोंदिया कार्यालय येथे कार्यरत राहावे लागणार आहे.तर सडक अर्जुनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कारभार डोंगरगाव आगाराचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन ठाकरे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले आहे.