नक्षलग्रस्त भागातील पठ्ठ्याची उंच भरारी,एअर इंडियाचा पायलट बनला ; वडिलांचं टीव्ही दुरुस्तीचं दुकान.


नक्षलग्रस्त भागातील पठ्ठ्याची उंच भरारी,एअर इंडियाचा पायलट बनला ; वडिलांचं टीव्ही दुरुस्तीचं दुकान.


नितेश मँकलवार - उपसंपादक


सिरोंचा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आलेख मारगोनीने उंच भरारी घेतली आहे. नक्षलग्रस्त भागातील या तरुणाची एअर इंडियामध्ये निवड झाली आहे.जिद्दीला कठोर परिश्रमाची जोड दिल्यावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश साध्य करता येते. अतिदुर्गम,आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एका तरुणाने हे कृतीतून दाखवून दिले आहे.वडिलांनी टीव्ही दुरुस्ती करून मुलाला शिकवले.त्याने देखील कठोर परिश्रम घेऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि पायलट होण्याच्या स्वप्नाला आकार मिळाला.


मिळालेल्या माहितीनुसार,आलेख मारगोनी असं त्या तरुणाचा नाव असून तो सिरोंचा येथील रहिवासी आहे. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. घरची प्रतिकूल परिस्थिती, शिक्षणाची पुरेशी सोय नाही.बाहेर शिकायला जायचं म्हणजे खर्च झेपेना.अशा विविध संकटावर मात करून त्याने पायलट होण्याचा बहुमान मिळविला आहे. आलेख मारगोनी याने बारावीनंतर तेलंगणा राज्यात पदवी शिक्षण घेतले. तिथेच त्याने पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले.


२०१९ मध्ये एका खाजगी कंपनीसाठी पायलट म्हणून काम करणाऱ्या आलेखची आता एअर इंडिया मध्ये निवड झाली असून तो लवकरच रुजू होणार आहे. सिरोंचा येथील दामोदर सत्यनारायण मारगोनी हे सामान्य इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक,सिरोंचा हा गडचिरोली जिल्ह्यातील तसेच राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला. त्यामुळे टीव्ही, फ्रीज ही साधनेही काही वर्षांपूर्वी अपुरीच होती. दामोदर मारगोनी हे आठवडा बाजारात टीव्ही, फ्रिज, कुलर दुरुस्तीची कामे करत असे.त्यांना आलेख आणि अविनाश ही दोन मुले. परिस्थिती बिकट होती पण शिक्षणाचे महत्त्व ते जाणून होते.त्यामुळे दामोदर यांनी मुलांच्या शिक्षणात पैसे कमी पडू दिले नाही.


दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकचे काम करतानाच दामोदर मारगोनी यांनी गावात टीव्ही फ्रिजचे छोटेसे दुकान सुरू केले.व्यवसायात त्यांनी भरारी घेतली अन् मुलांनी शिक्षणात. धाकटा मुलगा अविनाश अभियंता झाला तो दिल्लीच्या गुडगावात कार्यरत आहे. तर मोठा मुलगा आलेख हा पायलट बनला. पायलट झालेला तो सिरोंचा तालुक्यातील पहिलाच तरुण आहे. आलेख दामोदर मारगोनी या तरुणाने स्वप्न पूर्ण होताच त्याने आई-वडिलांना तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील बेगमपेठ विमानतळावर बोलावले.


तेथून संपूर्ण शहराची हवाई सफर घडविली. त्यामुळे आलेखसह त्याच्या आई-वडिलांचे कौतुक होत आहे. शिक्षण सुरू असताना आई-वडिलांनी पूर्ण सहकार्य केले. अडचणी अनेक होत्या.पण शिक्षणासाठी पैसे नाहीत,असे कधी जाणवू दिले नाही.आई-वडिलांची खंबीर साथ व गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळेच मी पायलट होऊ शकलो,असे आलेखने सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !