बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीराचे सियाचिन ग्लेशियर मध्ये निधन.
★ सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
एस.के.24 तास
बुलढाणा : लेह लद्दाखमधील सियाचिन ग्लेशियर या सर्वाधिक उंच बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असताना पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा) च्या अग्निवीर जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी (ता. २३) मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अक्षय लक्ष्मण गवते असे अग्निवीराचे नाव आहे. जेमतेम २२ वर्षे वय असलेल्या जवानाने देशासाठी आपला जीव गमावला. त्यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान आज रविवारी संध्याकाळी संभाजीनगर येथे दाखल होणार आहे.
त्यांचे पार्थिव संभाजीनगर येथील लष्कर रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास लष्करी वाहनाने त्यांचे वाहन पिंपळगाव सराई येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. अग्निवीर गवते हे ३० डिसेंबर २०२२ रोजी युनीट ६९ मैदानी रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून सियाचिन ग्लेशियर भागात ते कर्तव्यावर होते. त्यांनी सैन्यात ९ महिने २१ दिवस सेवा दिली.