गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या दिभना येथे रानटी हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या दिभना परिसरात शेतात आलेल्या रानटी हत्तींना जंगलाच्या दिशेने वळविण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याला रानटी हत्तीने सोंडेने उचलून खाली आपटले. त्यानंतर त्याला पायाखाली चिरडून ठार केले. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ :०० वा.च्या सुमारास घडली.होमाजी गुरनुले वय,५५, रा. दिभना) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
दिभनापासून दोन किमी अंतरावरील शेतशिवारात रानटी हत्ती आल्याची माहिती दिभना गावात मिळाली. त्यानुसार होमाजी गुरनुले हे अन्य एका शेतकऱ्यासोबत आपल्या शेतात रात्री.८ वा.ताच्या सुमारास पीक संरक्षणार्थ व कळपाला जंगलाच्या दिशेने वळवण्यासाठी गेले होते.
रानटी हत्तींना शेतातून जंगलाच्या दिशेने वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.परंतु शेतात सर्वत्र हत्ती पसरले होते. कळपातीलच एका हत्तीने होमाजी गुरनुले यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी एका झाडाचा आडोसा घेतला परंतु चवताळलेल्या हत्तीने होमाजी यांना सोंडेने उचलून जागीच आपटले व त्यानंतर तुडविले.यात होमाजी गुरनुले हे जागीच ठार झाले तर सोबतचा शेतकरी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, या भागात गेल्या आठवडाभरापासून रानटी हत्ती ठाण मांडून आहेत, पण, वन विभागाने योग्य ती सतर्कता बाळगली नाही. शेतकरीच हत्तींना जंगलाच्या दिशेने वाळविण्यासाठी गेले होते. त्यात एकाला जीव गमवावा लागल्याने वन विभागाच्या कारभारावर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.