घुग्घुस मध्ये तणावाची स्थिती,दंगल नियंत्रण पथक दाखल. ★ रावण दहणाला विरोध आदिवासी समाजाची भूमिका.

घुग्घुस मध्ये तणावाची स्थिती,दंगल नियंत्रण पथक दाखल.


★ रावण दहणाला विरोध आदिवासी समाजाची भूमिका.


एस.के.24 तास


घुग्घुस : रावण आमचा देव असल्याने कुठल्याही परिस्थितीत रावण दहन करू नये,रावणाची प्रतिमा निर्माण करू नये अशी भूमिका आदिवासी बांधवानी घेतली.यामुळे घुग्घुस शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था लक्षात घेता पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले.दंगा नियंत्रक पथकाला यावेळी पाचरण करण्यात आले. दसरा व धमचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आहेत.


घुग्घुस शहरात सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आदिवासी समाज बांधवांनी रावण दहनासाठी प्रतिमेचे निर्माण करण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली, यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक आसिफराजा व पोलीसदलाने समाज बांधवांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले.चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथक बोलविण्यात आले.शांती व सुव्यवस्था बिघडू नये याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत आहे. आज शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचीही रॅली निघणार असून विजयादशमी असल्याने पोलिसांवर या घटनेचा प्रचंड दबाव निर्माण झालेला आहे.


शहरातील आदिवासी बांधवांनी रावण दहनाला विरोध केला असून रावण दहन केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत घुग्घुस शहरात निषेध मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. तर बहादे प्लॉट येथे रावण दहन करू देणार नाही,असा पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतला असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले दंगा नियंत्रण पथकसुद्धा घटनास्थळी दाखल झाले.


अन्याय, अहंकारी,पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला असल्याची आख्यायिका आहे.त्यानुसार देशभरात हिंदू धर्मीय रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात.रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असून त्यांचे दहन करू नये,अशी आदिवासी समाजाची मागणी आहे.





#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !