सावली तालुक्यातील राजोली फाल येथे दोन वाघांची शिकार बावरीया टोळी च्या आणखी पाच जणांना अटक.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
चंद्रपूर : बावरीया टोळीने सावली तालुक्यातील राजोली फाल येथे दोन वाघांची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने सोमवारी गुवाहाटी येथून बावरीया टोळीच्या आणखी पाच आरोपींना अटक केली आहे.राजवंती बावरिया,मायावती बावरिया, रामदास बावरिया अर्जुन सिंग बावरिया,प्रकाश बावरिया अशी अटकेतील आरोपींची नावे असून यात दोन महिलांचाही समावेश आहे.वाघाच्या शिकार प्रकरणी आरोपींची संख्या आठ वर पोहोचली असून आणखी संशंयितांची नावे समोर आल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
गडचिरोली येथे शिकार केलेल्या वाघाचे कातडे गुवाहाटी येथे वनविभागाने जप्त केले होते. गडचिरोली वनविभागाने गुवाहाटी येथून तीन आरोपींना अटक करून चौकशीसाठी गडचिरोलीत आणले होते.दरम्यान आरोपींची अधिक चौकशी केली असता, सावली वनापरिक्षेत्रातील राजोली फालमध्ये दोन वाघांची शिकार केल्याची माहिती आरोपींनी वनविभागाला दिली.
त्यामुळे सावली वनविभागाला आरोपींची चौकशी करणे आवश्यक होते.मात्र,आरोपी गडचिरोली वन विभागाच्या ताब्यात होते.त्यांची चौकशी झाल्यानंतर जिल्हा कारागृह चंद्रपूर ला रवानगी करण्यात आल्यानंतर तीनही आरोपींचा ताबा मिळावा यासाठी सावली वनविभागाने न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सावली न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर बावरिया रुमाल सिंग प्रभू सिंग बावरिया,राजू सिंग गोपी सिंग बावरीया,सोनू सिंग रणजीत सिंग बावरिया या तीनही आरोपींना सावली वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी ठोठावली.वन कोठडी ठोठावण्यात आल्यानंतर वनविभागाच्या पथकाकडून आरोपींना मौका चौकशी करण्यासाठी राजोली फाल येथील घटना स्थळावर नेण्यात आले. यावेळी आरोपींनी काही संशयित आरोपींची माहिती वन विभाग दिली.त्यानुसार वनविभागाने पुन्हा गुहावाटी गाठून बावरीया टोळीच्या ५ आरोपींना अटक केली आहे.
पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना वन कोठडी ठोठावण्यात आली आहे. राजोली फाल येथील दोन वाघांच्या शिकार प्रकरणी एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात आरोपींना सहकार्य करणाऱ्या संशयित आरोपींची नावे सुध्दा बावरीया टोळीने वनविभागाला दिली आहे.त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.घटनेचा अधिक तपास सहायक वनसंरक्षक,आदेश कुमार शेंडगे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी जी.आर.नायगमकर व वनविभागाचा चमू तपास करीत आहे.