शिंदे गटा च्या खासदाराचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा ; लोकसभा अध्यक्षांच्या नावे लिहिले पत्र.
एस.के.24 तास
यवतमाळ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा क्षेत्राचे खासदार, हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पदाचा राजीनामा देत असल्याचे कळवले.
मराठा समाजातील आरक्षणाची मागणी केंद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी खासदार पाटील यांची भेट घेतली. सरकार आरक्षण देत नसल्याने खासदारकीचा राजीनामा द्या,अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. त्यांच्या या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या ‘ लेटर हेड ’वर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.
या पत्रात पाटील यांनी आपण लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत,असा कुठेही उल्लेख न करता,आरक्षणाच्या आंदोलनास माझा पाठिंबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.असा उल्लेख केला आहे.त्यामुळे हा राजीनामा आंदोलकांच्या समाधानासाठी लिहिला की,हेमंत पाटील यांना आरक्षणाच्या मुद्यावरून खरोखरंच आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायचा आहे,याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.