तासगावात धनगर समाजाचा मोर्चा.
एस.के.24 तास
सांगली : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी धनगर समाजाच्या वतीने तासगावात भव्य मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात शेळ्या, मेंढ्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.धनगर जमात आरक्षण कृती समिती तासगावच्यावतीने आयोजित मोर्चामध्ये सहभागी होत खासदार संजयकाका पाटील,जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील,युवक नेते प्रभाकर पाटील यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.तासगाव तालुक्यातील सर्व गावातून शेकडो धनगर समाज बांधवांनी भिलवडी नाका येथून धनगरी ढोल व कैताळाचा गजर करत गजी नृत्य करीत मोर्चाला सुरूवात केली.
कोकणे कॉर्नर,सिध्देडर चौक, वंदे मातरम् चौक,बागणे बिल्डिंग या मार्गावरून मोर्चा बसस्थानक चौकात आल्या नंतर मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले.धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तासगाव शहरात भव्य स्मारक उभारावे, तसेच मेंढपाळ व मेंढ्यांवर होणारे हल्ले थांबवावेत.हल्ले करणार्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी व मेंढपाळ बांधवांना संरक्षण मिळावे,आदी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे,युवक नेते उमेश गावडे, वकील विनायक पाटील, अर्जुन थोरात, श्रीनिवास पाटील, प्रभाकर पाटील,बाळासाहेब एडके,अमोल हुलवाने, विकास मस्के रामभाऊ थोरात,मारुती एडके,राहुल हजारे,मारुती एडके यांसह मान्यवर उपस्थित होते.