मुल तालुक्यातील पुनर्वसित भगवानपुर येथे मा.जिल्हाधिकारी महोदयांनी भेट दिली.
राजेंद्र वाढई : उपसंपादक
मुल : दिनांक 27 ऑक्टोबर रोज शुक्रवार ला मा.जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुल तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पुनर्वसित भगवानपुर येथे भेट दिली. भद्रावती तालुक्यातील बोटेझरी व चंद्रपूर तालुक्यातील कोळसा येथून प्रकल्पबाधित नागरिकांचे सन 2007 व 2012 अशा 2 टप्प्यांमध्ये मुल तालुक्यातील भगवानपुर येथे पुनर्वसन करण्यात आले होते.
मा.जिल्हाधिकारी महोदयांनी भगवानपुर गावातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.गावातील नागरिकांना योग्यरीत्या जनसुविधांचा लाभ मिळावा याकरिता नागरिकांशी संवाद साधून संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.
त्यामध्ये पिण्याचे पाणी,समाजमंदिर,पांदण रस्ते, शहरांना जोडणारे रस्ते, तलावाचे काम, भोगवतदार वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रुपांतर करणे, इत्यादी कामांबाबत चर्चा झाली.मा.जिल्हाधिकारी यांनी जि प प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.शाळेमधील विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ,नायक, शिक्षणमंत्री,इ कसे वर्गावर नियंत्रण ठेवतात व वेगवेगळे उपक्रम राबवतात हे जाणून घेतले.तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे पोषण आहार, पाणी सुविधा,संरक्षण भिंत, मैदान याबद्दल माहिती घेतली.
तसेच दिनांक 28 ऑक्टोबर ला मौजा भगवानपुर येथे तहसील कार्यालय मुल,चंद्रपूर,भद्रावती व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर तर्फे आयोजित केलेल्या शिबिरामध्ये सर्व आदिवासी शबरी घरकुल आवास योजना पात्र लाभार्थ्यांनी व इतर योजना पात्र लाभार्थ्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र,जात प्रमाणपत्र इत्यादी करिता आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन केले.यावेळी डॉ रवींद्र होळी तहसीलदार मुल,बी एच.राठोड गट विकास अधिकारी मुल,वन परिक्षेत्र अधिकारी मुल,सरपंच भगवानपुर उपस्थित होते.
त्यानंतर सावली व मुल एमआयडीसी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत कार्पेट निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.प्रशिक्षण केंद्रामधील महिला प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला व कार्पेट निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली.मुल एम.आय.डी.सी.तील कार्यरत कंपण्याबाबत माहिती घेतली तसेच इथेनॉल निर्मिती कंपनी येथे भेट दिली. माविम अंतर्गत मैत्रीण लोकसंचलित साधन केंद्र मुल येथे भेट दिली.त्या ठिकाणी बांबू पासून बनवण्यात येणारे वस्तू व प्रक्रिया याबाबत जाणून घेतले.