कळमना ग्रामपंचायतला तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार.
★ अमृत महाआवास अभियान अंतर्गत सरपंच नंदकिशोर वाढई यांनी घेतलेल्या विविध उपक्रमांची दखल.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : पंचायत समिती राजुराच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात राज्य व्यवस्थापना कक्ष - ग्रामीण गृहनिर्माण पंचायत समिती राजुरा जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने अमुत महा आवास अभियान २०२२ - २०२३ अंतर्गत तालुक्यातील मौजा कळमना येथे राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल राजुरा तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तालुका स्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांच्या हस्ते कळमनाचे स्मार्ट,उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांना मानपत्र,स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी कळमनाचे स्मार्ट, उपक्रमशील सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, विविध उपक्रम राबवून गावातील नागरिकांना सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपण करीत आहोत. यात संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची उत्तम साथ मिळत असल्याने कळमना ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत आहे. या पुरस्काराने आम्हाला अधिक ऊर्जा मिळाली असून पुर्ण क्षमतेने गाव विकासासाठी काम करणार.
या प्रसंगी गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, विस्तार अधिकारी रवींद्र रत्नपारखी,ग्रामसेवक मरापे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नगराळे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.