राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनातील परिसंवाद.
★ स्वातंत्र्य आंदोलनाच्या यशस्वीतेत गावोगावच्या मंदिरातील लोकशिक्षण प्रभावी ठरले. - बंडोपंत बोढेकर
एस.के.24 तास
वर्धा : आजनसरा गावात चारित्र्य निती वाढावी ,सद्विचार,सतकर्तव्याची भावना जनमानसात जागविली जावी,या सद् हेतूने गावोगावच्या मंदिरातून पूर्वीच्या संत मंडळीनी लोकशिक्षणाचे मोठे कार्य केलेले आहे.आता तर ग्रामसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी, येणाऱ्या पिढीत मूल्य शिक्षण रूजवण्यासाठी गावोगावी सामुदायिक प्रार्थना मंदिरे उभी झाली पाहिजेत.यामुळे मानवतावादी वैश्विक दृष्टी वाढीस लागून राष्ट्रसंताना अपेक्षित ग्रामपरिवर्तनाच्या कार्यास निश्चितपणे गती मिळेल,असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी आजनसरा येथे केले.
श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा आणि अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.गांधी जयंतीच्या निमित्ताने आयोजित श्रीक्षेत्र आजनसरा येथे झालेल्या 'मंदिरे लोकशिक्षणाची पाठशाळा' या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर प्रमुख वक्ते म्हणून नितेश ओझा (सांगली) सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे सौ.पुष्पाताई बोंडे, डॉ.प्रकाश महाकाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बंडोपंत बोढेकर पुढे म्हणाले की, ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी एकाग्रता हवी असते.मानवी मनाच्या शक्तीला काही सीमा नसुन ते एखाद्या गोष्टीवर जितके एकाग्र होईल तितके त्याचे आकलन होऊ शकेल. मंदिराच्या माध्यमातून अंतर्विज्ञानाचे योग शिक्षण दिले गेले पाहिजे,असे ते म्हणाले.
या परिसंवादात उर्वरित दोन्ही वक्त्यांनी समयोचित विचार व्यक्त केले. उपस्थितांमध्ये प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ,एड.राजेंद्र जेनेकर,आचार्य ना.गो.थुटे डॉ. श्रावण बाणासुरे, प्रा. नामदेव मोरे, गोपाल कडू, दादाजी झाडे,उरकुडे महाराज आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन,पद्माकर ठाकरे यांनी केले.