भर पावसात उघड्यावर रुग्ण ; मेडिकल रुग्णालय परिसरात चालले काय. ?
एस.के.24 तास
नागपूर : येथील मेडिकल रुग्णालय परिसरात भर पावसात गुरुवारी सुमारे चार रुग्ण उघड्यावर पडून होते. भिजलेल्यांपैकी एकाची प्रकृती जास्तच खालावल्यावर त्याला दाखल केले गेले.तर तीन रुग्ण रात्री उशिरापर्यंत दुर्लक्षित असल्याने वेदनेने विव्हळत असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
मेडिकल परिसरात पायाला गँगरीन सदृश्य आजार असलेला रुग्ण पडून होता. त्याने पावसात जखम भिजू नये म्हणून प्लास्टिक गुंडाळले. दुसरा रुग्ण ट्रामा केअर सेंटरजवळ पडून होता. या ६५ ते ७० वयोगटातील वृद्धाची प्रकृती जास्तच खालावल्यावर काहींचे त्याकडे लक्ष गेले. त्यानंतर तातडीने त्याला आकस्मिक विभागात नेऊन दाखल केले गेले. परंतु, मेडिकलच्या द्वारावरील पोस्ट ऑफिसजवळ तीन रुग्ण उद्यानाच्या भिंतीला लागून खुल्या भागात पावसात भिजत पडून होते. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना कुणीही दाखलही करत नव्हते. त्यामुळे या रुग्णांपैकी कुणी दगावल्यास जबाबदार कोण ? हा प्रश्न उपस्थितांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, या भागात मोठ्या संख्येने बेवारस अथवा गरीब घरातील व्यक्ती उपचाराची ऐपत नसल्याने रुग्णाला टाकून जाण्याचेही प्रमाण जास्त आहे. त्यापैकी कुणी हे रुग्ण असण्याचीही शक्यता येथे व्यक्त होत आहे. या विषयावर मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षकासह इतर काही अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. तर एका अधिकाऱ्याने तातडीने या रुग्णांना दाखल करण्यासाठी संबंधिताला सूचना करण्याचे आश्वासन दिले.