यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेकरीता निधी द्या ; अखिल ढिवर समाज विकास समितीची निवेदनाद्वारे मागणी.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी
भंडारा : भटक्या विमुक्त समाजाचे राहणीमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सन २०२१-२२ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये लाखनी तालुक्यातील ५०० पेक्षा जास्त घरकुल लाभार्थ्याना प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. मात्र निधी उपलब्ध केला गेला नाही. निधी उपलब्ध करावा या करिता गट विकास अधिकारी अरुण गिऱ्हेपुंजे यांचे मार्फत समाज कल्याण विभागास निवेदन अखिल ढिवर समाज विकास समितीच्या वतीने पाठविण्यात आले आहे.
पडक्या व कच्च्या मातीच्या घरात तसेच भाड्याच्या घरात वास्तव्यास असणाऱ्या भटक्या विमुक्त जातीच्या लाभार्थ्यांसाठी शासनाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येत आहे. पंचायत समिती लाखनी अंतर्गत या योजनेचे सुमारे ५०० प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आले आहेत.
त्यापैकी बहुतांश प्रस्तावांना मंजुरीही प्रदान करण्यात आली आहे पण निधी अभावी घरकुलांची कामे सुरू केली गेली नाही सध्या पावसाळा असून या प्रवर्गाच्या कुटुंबीयांच्या घराची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तर घर माती कौलाची असल्यामुळे पावसाळ्यात घरात दल दल असते. मंजूर लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करावा याकरिता ३ मार्च रोजी निवेदन अखिल ढिवर समाज विकास समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
करिता निधी उपलब्ध करावा याकरिता पंचायत समिती लाखनी चे गटविकास अधिकारी अरुण गिऱ्हेपुंजे यांचे मार्फत समाज कल्याण विभागास स्मरणपत्र निवेदनाच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे. तालुका अध्यक्ष शिवशंकर मांढरे, सचिव चंद्रभान मांढरे, कोषाध्यक्ष दुधपचारे सर, सहसचिव विठ्ठल दिघोरे, सहकोषाध्यक्ष मनीराम नान्हे, मार्गदर्शक मन्साराम मांढरे,मीराबाई चाचेरे एकलव्य सेनेचे अनिल दिघोरे राजकुमार मोहनकर यांचे सह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.