भामरागड गायवाटप घोटाळ्याची चौकशी उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांच्या कडे ; घोटाळेबाजांचे धाबे दणाणले.

भामरागड गायवाटप घोटाळ्याची चौकशी उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांच्या कडे ; घोटाळेबाजांचे धाबे दणाणले.


एस.के.24 तास


गडचिरोली : मागील पाच महिन्यांपासून गाजत असलेल्या गाय वाटप घोटाळ्याची चौकशी धडाकेबाज उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांच्याकडे देण्यात आलेली आहे.अखिल भारतीय सरपंच परिषदेने केलेल्या आंदोलना नंतर जिल्हाधिकारी,संजय मीणा यांनी वरील निर्देश दिले असून यामुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहे.


भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत २० लाभार्थ्यांना दुधाळ गायींसाठी प्रत्येकी एक लाख रुपये खात्यात जमा करण्यात आले. पैसे काढल्यावर गायी देण्यात येतील,असे सांगण्यात आले व त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पैसे परस्पर दुसऱ्या खात्यात वळते केले. त्यानंतर लाभार्थ्यांना ना गायी दिल्या ना अनुदान दिले, यातून त्यांची फसवणूक झाल्याचे पाच महिन्यांपूर्वी ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणले होते. 


त्यामुळे कारवाईसाठी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष,योगाजी कुडवे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या प्रकरणात कंत्राटदारासह प्रकल्प कार्यालयातील अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा कुडवे यांचा आरोप आहे. त्यामुळे २०२० ते २०२३ या दरम्यान राबविलेल्या विविध योजनांची चौकशी करुन अधिकाऱ्यांची एसआयटी व एसीबीमार्फत चौकशी करावी, दोषींवर ॲट्रॉसिटीनुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.


याची दखल घेत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी अहेरी उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांच्याकडे चौकशी सोपविली आहे.कर्तव्यदक्ष, धडाकेबाज अधिकारी अशी ओळख असलेले वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणावर बोट ठेवत स्वतःच्याच कार्यालयाला टाळे लावले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. आता गाय वाटप घोटाळ्याची चौकशी त्यांच्याकडे दिल्याने घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !