गोंदिया जिल्ह्यातील शरणार्थी ११०३ तिबेटी बांधवांना आपल्या देशात जाण्याची ओढ.
★ ७२ वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यात आश्रय.
एस.के.24 तास
गोंदिया : शरणार्थी म्हणून आलेल्या ११०३ तिबेटी बांधवांना आपल्या देशात जाण्याची ओढ अद्यापही लागून आहे. मात्र, त्याचा मार्ग अद्यापही मोकळा झालेला नाही. परिणामी, त्यांना घरवापसीच्या प्रतीक्षेत गेल्या ७२ वर्षांपासून इथेच आयुष्य जगावे लागत आहे. ते अद्यापही तिबेट स्वतंत्र होण्याच्या अपेक्षेत आहेत. १ ऑक्टोबर १९४९ हा दिवस तिबेटीयन बांधवांकरिता काळा दिवस म्हणून ओळखण्यात येतो. हजारो चिनी सैनिकांनी तिबेटमधील थंग्सी नदी ओलांडून तिबेटवर कब्जा केला. यापूर्वी तिबेट हा देश स्वतंत्र राष्ट्र होता. आक्रमण करून आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तिबेटच्या हजारो महिला, पुरूषांना ठार केले.
क्रूरता ,अन्याय, अत्याचाराला कंटाळून ८ मार्च १९४९ ला चौदावे दलाई लामा यांनी सुमारे ३०० नागरिकांसह भारत गाठले. त्यांनी हिमाचल प्रदेशात निर्वासित तिबेटियनांची धर्मशाळा स्थापन केली. महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव (प्रतापगड) १०३ घरांमध्ये ११०३ तिबेटियन बांधव सध्या वास्तव्यास आहेत. शासनाने बुटाई क्रमांक १ येथे त्यांचे पूनर्वसन केले. प्रत्येक कुटुंबाला जमीन देखील दिली आहे. या तिबेटी शरणार्थिंना ६१२.८० एकर जमीन देण्यात आली असून ४०५ एकर जमीन शेतीयोग्य आहे.
प्रत्येक कुटुंबाला ६० डिसमिल जमीन देण्यात आली आहे. येथील तिबेट कँपमध्ये वास्तव्यास असलेले महिला आणि पुरूष आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा बाळगून आहेत. ते आधुनिकरित्या धानाची शेती करतात तसेच त्यांचा उबदार कपड्यांचा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. तिबेटियन बांधवांचे श्रद्धास्थान चौदावे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो हे आध्यात्मिक नेता आहेत. तिबेटियनांची ही संस्कृती बघण्याकरिता अनेक राज्यांतील नागरिक गोंदिया जिल्ह्यातील गोठणगाव (प्रतापगड) येथे येतात.