फडणवीस यांनीच लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले ; पाप झाले म्हणून माफी मागितली. - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,नाना पटोले
एस.के.24 तास
चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत ‘इंडिया’ची बैठक सुरू असताना मराठ्यांना उपोषणाला बसण्यास सांगितले तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकर्त्यांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. कुठे ना कुठे राज्य सरकार व फडणवीस यांच्याकडून पाप झाले आहे, त्यामुळेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे.सरकार चुकले म्हणून गुन्हे वापस घेतले आहेत.पाप झाकण्यासाठी सरकारने ही कृती केली आहे.राज्यातील सरकार जल्लाद असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,नाना पटोले यांनी केले.
जनसंवाद यात्रेनिमित्त चंद्रपुरात प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पत्रपरिषदेत भाजप व मोदी सरकार तथा राज्यातील सरकारवर गंभीर आरोप केले. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, शहर अध्यक्ष रामु तिवारी, माजी काँग्रेस अध्यक्ष विनायक बांगडे, दिनेश चोखारे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषद मध्ये पटोले यांनी मोदी सरकार च्या काळात देशाची अवस्था वाईट झाली आहे, राज्यात व केंद्रात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे.
आमचे दुःख मांडायला चौथा स्तंभ देखील समोर येत नाही ही व्यथा जनसंवाद यात्रेत लोक मांडत आहेत. एकीकडे २५ जणांचे मृतदेहावर अंतिम संस्कार सुरू होते तर दुसरीकडे राजभवनात मंत्रीमंडळाचा शपथ विधीचा जल्लोष सुरू होता.शेतकरी आत्महत्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम करत आहे. भाजप नकली पार्टी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी व सत्ता मिळविण्यासाठी काहीही करायला तयार आहे.
विरोधी बाकावर असताना फडणवीस मराठयांना २४ तासात आरक्षण देण्याची भाषा बोलत होते. आता फडणवीस सत्तेत असताना आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. आरक्षणाचा विषय भडकवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. उलट काँग्रेस हा वाद भडकवण्याचा नाही तर सर्वांना सोबत घेऊन शांत करण्याचे काम आहे.
काँग्रेस पक्ष देशात स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढत आहे. देशात सर्वत्र गंभीर परिस्थिती आहे.भारत आणि इंडिया एकच आहे.२४ पक्ष इंडिया मध्ये एकत्र आल्याने मोदी सरकार घाबरले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची घोषणा करताना विरोधकांना विश्वासात घेण्यात आले नाही.त्यामुळे विशेष अधिवेशनात नेमके काय करणार आहे याकडे देशाचे लक्ष लागले आहे.