भ्रष्टाचार प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित,तरीही तीन विभागाचा प्रभार
एस.के.24 तास
गडचिरोली : सव्वा लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर ते फरार झाले.त्यानंतर भामरागडचे गटविकास अधिकारी स्वप्नील मकदूम यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला.मात्र, मगदूम यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत केलेले ‘पराक्रम’ सर्वश्रूत आहेत. त्यामुळे गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अहेरीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ ऑगस्टला तेंदूपत्ता युनिट लिलावात घेण्यासाठी व वाहतूक परवाना देण्यासाठी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार यांच्या सांगण्यावरुन कंत्राटदाराकडून एक लाख ३० हजारांची लाच घेताना खासगी व्यक्तीसह तालुका पेसा समन्वयक या दोघांना रंगेहाथ पकडले होते. कारवाईची कुणकुण लागल्यावर चन्नावार याने धूम ठोकली. त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही.
दरम्यान, सामान्यांची कामे खोळंबू नयेत यासाठी अहेरी पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार भामरागड येथील गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांच्याकडे सोपविण्यात आला.दुर्गम भामरागडमध्ये थेट मंत्रालयातून मंजूर झालेल्या मग्रारोहयो कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण तीन महिन्यांपूर्वी समोर आले होते.चौकशी सामितीच्या अहवालानंतर भमारागड गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांच्यासह २३ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला होता.
यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तीन ग्रामसेवकांचे निलंबन, चार ग्रामसेवकांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती, तर भामरागडचे गटविकास अधिकारी स्वप्नील मकदुम यांच्याविरुध्द शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता.याशिवाय शाखा अभियंता सुलतान आजम यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करुन एका कंत्राटी कर्मचाऱ्याची सेवासमाप्ती केली होती तर एक सहायक लेखाधिकारी व एका विस्तार अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला होता.
वादग्रस्त अधिकाऱ्यावर एवढा विश्वास कसा ?
भामरागडमध्ये मग्रारोहयो घोटाळ्यात वादग्रस्त ठरुनही स्वप्नील मग दूम यांची खुर्ची शाबूत राहिली. भामरागड येथील नगरपंचायतचे मुख्याधिकारीपद रिक्त असल्याने नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. मात्र, यात बदल करुन २६ जूनला भामरागडचे गटविकास अधिकारी स्वप्नील मगदुम यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला.आता अहेरी पंचायत समितीची सूत्रेही त्यांच्या हाती सोपवली आहेत.
अहेरी पंचायत समितीत प्रशासकीय कामकाज सुरळीत व्हावे,यासाठी गटविकास अधिकाऱ्याचा पदभार देण्यासाठी दुसरा सक्षम अधिकारी नव्हता, त्यामुळे भामरागडच्या अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार सोपवावा लागला. त्यांच्यावर पूर्वी काय आरोप झालेले आहेत, याची मला माहिती नव्हती. मात्र, याची माहिती घेऊन आवश्यक ते बदल केले जातील. - आयुषी सिंह,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.गडचिरोली