सिरोंचा ते आरसअल्ली रस्ता बांधकाम न करताच सहा कोटींची उचल ; जाणून घ्या काय आहे प्रकरण.
एस.के.24 तास
अहेरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ मधील सिरोंचा ते आरसअल्ली दरम्यान रस्ते बांधकामाची ३३ किलोमीटर अंतराची निविदा असताना २२ किलोमीटर रस्ता बांधकाम करून उर्वरित रस्ता न बांधता ६ कोटींची उचल करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.अहेरीचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांना दिलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक दावे करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील सिरोंचा ते आरसअल्ली दरम्यानच्या कामासाठी निविदा काढण्यात आली. त्यात ३३ किमी अंतराचा उल्लेख आहे, पण प्रत्यक्षात केवळ २२ किलोमीटर रस्ता दाखविण्यात आला आहे.उर्वरित ११ किलोमीटर रस्त्याचे कामच केले नाही,असा ताटीकोंडावार यांचा दावा आहे. विशेष म्हणजे महामार्गाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचाच्या हद्दीतील आहे,परंतु करारनामा पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग २ गडचिरोली येथे करण्यात आला. महामार्गाच्या पाच कोटींवरील कामासाठी मिक्स प्लांटने काम करणे अनिवार्य आहे.
मात्र, कंत्राटदाराने ड्रम मिक्स प्लांटमधून डांबर वापरले . कंत्राटदार, अधिकाऱ्यांनी करारनाम्यात आगाऊ जीएसटीची मागणी केली आहे. सदर महामार्गावर दिशादर्शक फलक, क्रॅश गार्ड, साईन बोड, माहिती फलक, बसस्थानक आदीचे कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही, असे तक्रारीत नमूद आहे.
सिरोंचा - असरअल्ली या महामार्गाची वर्षभराच्या आतच अक्षरश : चाळण झाली आहे. या कामामध्ये यंत्रणेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन कंत्राटदाराने मनमानी पध्दतीने काम करुन निधी उचलला.त्यामुळे संबंधितांवर गुन्हे नोंदवावेत,अन्यथा न्यायालयात दाद मागणार आहे. - संतोष ताटीकोंडावार,सामाजिक कार्यकर्ते
तक्रार प्राप्त झाली आहे. याबाबत महामार्ग विभागाकडे खुलासा मागवला आहे. खुलासा आल्यानंतर नेमके काय ते समोर येईल, त्यानंतर चौकशीची दिशा ठरवता येईल. - वैभव वाघमारे,उपविभागीय अधिकारी,अहेरी