झाडीशब्द साधक पुरस्काराने प्रा.नामदेव मोरे सन्मानित.
एस.के.24 तास
चंद्रपूर : झाडीपट्टीतील नवसाहित्यिकांकडून बोलीच्या वैशिष्ट्याचे जतन व संवर्धन व्हावे, लिहित्या हाताना बळ मिळावे, या हेतूने झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेतर्फे 'झाडी शब्दसाधक' पुरस्कार देण्यात येतो.जनता कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस येथील प्रा. नामदेव मोरे यांना नुकतेच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार वितरण सोहळा आनंदवन येथील शांतिनिकेतन निजबल सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.परशुराम खुणे,आचार्य ना.गो. थुटे , आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष कवी अरुण झगडकर,महिला विभाग प्रमुख प्राचार्य रत्नमाला भोयर, वरोरा शाखाध्यक्ष पंडित लोंढे, मदनराव ठेंगणे, सुभाष उसेवार आदींची उपस्थिती होती.
प्रा. मोरे यांनी पुरस्कार मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मराठी भाषेचा विकास होण्यासाठी आपल्या बोली भाषेचे संवर्धन होणे आवश्यक आहे. झाडीबोली मंडळाने मला बोलीविषयी आवड निर्माण करून लेखनास प्रवृत्त केले. त्यामुळे झाडीबोलीचा विकास करणे व तिच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्नरत राहणे, हे माझे कर्तव्य असल्याचे मत मांडले.
प्रा.नामदेव मोरे चंद्रपूर झाडीबोली साहित्य मंडळाचे पदाधिकारी आहे. त्यांनी आजपर्यंत विविध ग्रंथांचे संपादन केले असून 'राष्ट्रसंतांच्या साहित्यातील शैक्षणिक मूल्ये' हा ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहे. याशिवाय त्यांचे शिक्षण संक्रमण,विविध साप्ताहिक, मासिकांत तसेच वर्तमानपत्रांत लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते विजुक्टाचे व धनोजे कुणबी समाज मंदिर,लक्ष्मीनगर येथे पदाधिकारी आहे.त्यांना सामाजिक कार्याची रुची असून आजपर्यंत विविध उपक्रमांत सहभाग घेऊन विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचेही यशस्वी आयोजन केले आहेत.