गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला राष्ट्रीय पुरस्कार ; राष्ट्रपतींच्या हस्ते गडचिरोलीचा सन्मान.
एस.के.24 तास
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित चामोर्शी येथील केवलरामजी हरडे महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ.पवन नाईक व स्वयंसेविका,जानव्ही पेद्दीवार यांना सन २०२१-२२ चा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा राष्ट्रीय पुरस्कार २६ सप्टेंबरला जाहीर झाला होता. दरम्यान २९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, भारत सरकारद्वारा राष्ट्रीय सेवा योजनेतील उत्कृष्ट कार्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. एकाच वेळी रासेयोचे दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पहिले विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठाला मान मिळाला. यशाबद्दल कुलगुरूंसह कुलसचिव व विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.