तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक ; छत्तीसगड सीमेवरील जंगलात पोलिसांची कारवाई.

तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक ; छत्तीसगड सीमेवरील जंगलात पोलिसांची कारवाई.


एस.के.24 तास


गडचिरोली : विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम ताडगाव व कियर जंगलात ही कारवाई करण्यात आली. सरजू ऊर्फ छोटू बंडू महाका (२८), मधु ऊर्फ अनू महारु कुमोटी (२३) , दोघेही रा. हलेवारा ता. भामरागड, अशोक लाला तलांडी (३०, रा. पासेवाडा, ता.कुडरू जि. बिजापूर, छत्तीसगड) अशी त्यांची नावे आहेत.


भामरागड हद्दीतील तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरात विशेष पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी त्यांना वाँटेड नक्षलवादी सरजू ऊर्फ छोटू महाका व मधु ऊर्फ अनू कुमोटी हे दोघे जंगलात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तेथे शोधमोहीम राबवून दोघांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर पथकाने भामरागड हद्दीतील कियर जंगल परिसरात अशोक तलांडी या छत्तीसगडच्या नक्षल्याच्या मुसक्या आवळल्या. तिन्ही नक्षलवाद्यांवर शासनाने प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तिघांनाही भामरागड न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


सरजू महाका हा २०१० मध्ये नक्षली चळवळीत आला. २०१८ मध्ये त्याने चळवळ सोडली. या दरम्यान दोन निरपराध व्यक्तींचे खून, पोलिसांशी चकमक, विसामुंडीजवळ पुलाच्या कामावरील ठेकेदाराचा जेसीबी व सिमेंट मिक्सर जाळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मधु कुमोटी हा २०१५ मध्ये सदस्य म्हणून नक्षली दलममध्ये सामील झाला.


दोन निरपराध व्यक्तींच्या खुनासह तीन चकमकीत त्याचा सहभाग होता. अशोक तलांडी हा छत्तीसगडच्या सँड्रा दलममध्ये भरती झाला होता. दोन वर्षांपासून त्याने चळवळ सोडली होती. मात्र, अधूनमधून नक्षल्यांना तो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करत असे.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !