वाघ शिकार प्रकरणात बावरिया टोळीची तब्बल १५ वाघांच्या शिकारीचे लक्ष्य,आता पर्यंत चार वाघांची शिकार.
★ टोळीने आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात दोन व गडचिरोली जिल्ह्यात दोन वाघांची शिकार केल्याचे उघडकीस आले आहे.
सुरेश कन्नमवार : मुख्य संपादक - एस.के.24 तास
चंद्रपूर: विदर्भात वाघांची संख्या वाढत असल्याचे जगभरातून कौतुक हाेत आहे. देशासह विदेशातील लक्षावधी पर्यटक वाघ बघायला विदर्भात येत आहेत. परंतु, दुसरीकडे वाघांची ही वाढलेली संख्या शिकाऱ्यांनाही खुणावत असून वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या हरियाणा व पंजाबातील बावरिया टोळीने विदर्भातील वाघांना लक्ष्य केले आहे. ही टोळी तब्बल १५ वाघांच्या शिकारीचे लक्ष्य घेऊन विदर्भात आली असून यातील चार वाघांची शिकार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या टोळीने आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात दोन व गडचिरोली जिल्ह्यात दोन वाघांची शिकार केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान या प्रकरणात रूमाली बावरिया (४८), राजू सिंग (३६) व सोनू सिंग (३८) या तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.अटक करण्यात आलेल्या बावरिया टोळीतील या शिकाऱ्यांकडून आठ ते दहा लोखंडी सापळे देखील जप्त करण्यात आले.
गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही जिल्ळ्यात त्यांनी ठाण मांडले आहे. चौकशीदरम्यान शिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती खात्याचे अधिकारी तपासत असून शिकारीत सहभागी असणाऱ्या इतरांचाही शोध घेतला जात आहे. बावरियांच्या शिकारीची पद्धत, त्यांना शिकारीसाठी मिळणारी मदत याचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत १९ आरोपींचा समावेश दिसून आला आहे.
जंगलाची संपूर्ण माहिती करून घेतली होती : -
वाघांचे अस्तित्त्व असलेले जंगल या टोळीने ओळखले आणि त्यासाठी त्यांनी स्थानिकांचीही मदत घेतली.त्यामुळे या टोळीला जंगलाची खडानखडा माहिती झाली आहे. त्यांना माहिती देणाऱ्या, त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांचा शोध पोलीस तथा वनविभाग घेत आहे.
टास्क फोर्स गठीत करण्यात आली : -
शिकार प्रकरणाचा छडा लावण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आले आहे.यात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर,गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक, रमेशकुमार, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, नीलोत्पन,पोलीस अधीक्षक गडचिरोली,ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्राचे कुशाग्र पाठक, गाभा क्षेत्राचे उपसंचालक नंदकिशोर काळे, गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक,मिलिश दत्त शर्मा,सहाय्यक वनसंरक्षक,बापू येळे,गडचिरोलीच्या सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके,सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर,गायकवाड, मेळघाट सायबर सेलचे आकाश सारडा,मुकेश जावरकर, दिनेश केंद्रे व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात २०२० – २०२३ या काळात एकाही वाघाची शिकार झालेली नाही. ब्रम्हपुरीच्या जंगलातही वाघाची शिकार झालेली नाही.ज्या काही वाघांच्या शिकारी झालेल्या आहेत त्या बाहेरच्या जंगलातील आहेत. शिकाऱ्यांकडे मिळालेले आठ ते दहा लोखंडी सापळे बघता शिकाऱ्यांचे १५ वाघांच्या शिकारीचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट होते.मात्र, वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करता आलेली नाही. - डॉ. जितेंद्र रामगावकर,वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक,ताडोबा