मॅजिक अभ्यासिकेत भावानेच बांधली बहिणीला राखी.
एस.के.24 तास
चिमुर : भिसी येथे सुरू असलेल्या मातोश्री अकॅडमीक गायडन्स इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स अँड ट्रेनिंग सेंटर अर्थातच मॅजिक अध्ययन केंद्रामध्ये आज दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी रक्षाबंधन सणानिमित्ताने का आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये भावानेच बहिणीला राखी बांधत वर्षानुवर्ष सुरू असलेला परंपरेला छेद देत नवीन पायंडा रोवला आहे.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा प्रसिद्ध सण आहे.रक्षा म्हणजेच संरक्षण आणि बंधन म्हणजे बंधन. राखी सामान्यत बहिणी भावाला बांधतात. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावांच्या प्रगतीसाठी मनोकामना व्यक्त करते आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण करण्याचे वचन देतो. भाऊ आपल्या बहिणींना काही भेटवस्तू देतो. भारतीय परंपरेनुसार अशा पद्धतीने हा सन साजरा केला जातो.
परंतु मॅजिक अभ्यासिकेचे मुख्य संयोजक वाल्मीक नन्नावरे यांच्या संकल्पनेतून एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये मॅजिक अध्ययन केंद्रात निवासी राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी तेथील विद्यार्थिनींना राखी बांधली. 21 व्या शतकातील बहिणींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी भाऊरायावर अवलंबून राहणे म्हणजे स्त्रीने स्वतःला असक्षम समजण्यासारखे आहे. एकीकडे महिला सक्षमीकरण्याच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे तिला संरक्षणाचे वचन देऊन ती असक्षम असल्याची दरवर्षी जाणीव करून द्यायची.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला दुय्यम दर्जाचे स्थान देऊन तिला कायम ऐतिहासिक गुलामगिरीत राहायला भाग पाडले आहे. या सामाजिक धारणेत बदल व्हायला हवेत. मातृसत्ताक आदिवासी संस्कृतीत स्त्रीला उच्च दर्जाचे स्थान आहे. यानुसार स्त्री हीच कुटुंबसंस्थेचा व समाज व्यवस्थेचा प्रमुख कणा असतो. म्हणून पुरुष असलेल्या भावानेच स्त्री असलेल्या बहिणीकडून स्वतःच्या रक्षणाचे वचन घ्यावे. भावाने स्वतःच्या बहिणीच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रगतीसाठी प्रकृतीकडे मनोकामना व्यक्त करावी. बहिणीने भावाला भेटवस्तू द्यावी. तिचं स्वातंत्र्य मान्य करावं. हा परिवर्तनशील विचार ठेवून बहिणीला रक्षाबंधन हा उत्सव मॅजिकमध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी ब्राईटएज फाउंडेशनचे सदस्य नितेश श्रीरामे, अंकुर उपक्रमाचे संयोजक विवेक चौके, साहस उपक्रमाचे संयोजक विलास चौधरी, विद्यार्थी संघटनेचे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष नामदेव घोडमारे, रितू श्रीरामे, सीमा चौके, माधुरी चौधरी, सुनीता घोडमारे आणि मॅजिकचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
" फक्त मुलगाच मुलीचे म्हणजेच बहिणीचे रक्षण करू शकतो, असा आजपर्यंतचा सामाजिक समज आहे. कारण तो सक्षम आहे आरोग्याने सुदृढ आहे. पण कित्येकदा असे घडले आहे की भावावर आलेल्या संकटाचा सामना हा बहिणीने केला आहे .भाऊ रडत असतो, खचलेला असतो तेव्हा त्याच्या पाठीशी नेहमी बहीनच खंबीर पणे उभी राहून धीर देताना मी बघितले आहे.भावाने न व्यक्त केलेल्या भावना बहिणीला कळतात.
परिस्तिथीचा कोणताही विचार न करता बहिण भिंती प्रमाणे नेहमी भावाच्या मागे संकटात उभी असते. बहीण आणि भाऊ एकमेकानची ताकत असतात. दोघेही एकमेकांची काळजी करतात.मग भावानीच बहिणीला राखी बांधणे यात काय गैर आहे ?. भावनेच बहिणीला कमजोर समजून तिचे रक्षण का करावे ? भावाने सुद्धा सक्षम समजून बहिणीला रक्षणाची जबाबदारी द्यावी तिला स्वतंत्र द्यावे आणि मुक्तपणे जगू द्यावे." - वाल्मीक ननावरे,मॅजिक संयोजक