गडचिरोली चे नवीन " सीईओं " समोर नियमबाह्य बदल्यांच्या चौकशीचे आव्हान.
★ शिक्षक संघटनेकडून चौकशीची मागणी.
एस.के.24 तास
गडचिरोली : शासनाने ‘ऑनलाईन’ बदली धोरण निश्चित केलेले असताना गडचिरोली जिल्हा परिषदेत २०२० – २२ या काळात शिक्षकांच्या बदल्या ‘ऑफलाईन’ पद्धतीने करण्यात आल्या. यामुळे पेसा क्षेत्रातील गावात शिक्षकांची पदे रिक्त झाली. या नियमबाह्य बदल्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाने नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बदली घोटाळा गाजण्याची चिन्हे आहेत.
सन २०२०-२२ या काळात गडचिरोली जिल्हा परिषदेत ४० शिक्षकांच्या बदल्या ‘ऑफलाईन’ पद्धतीने केल्या गेल्या. जेव्हा की शासनाने २०१७ आणि २०२१ मध्ये निर्गमित केलेल्या आदेशात समुपदेशन बदली शासन निर्णय २०१४ मधून शिक्षकांना वगळून ‘ऑनलाईन’ बदली धोरण निश्चित केले आहे. परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांनी शासन आणि न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून तब्बल ४० शिक्षकांच्या बदल्या केल्या. यामुळे पेसा क्षेत्रातील शिक्षकांची पदे रिक्त झाली. हा संपूर्ण प्रकार नियमबाह्य असून यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे.
त्यामुळे सदर नियमबाह्य बदल्या रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
तक्रारकर्ता शिक्षकलाच केले निलंबित : -
कथित बदली घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाऊन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक,प्रमोद खांडेकर यांनी यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्या होत्या. दोन वर्षांपासून ते सतत पाठपुरावादेखील करीत आहेत. यामुळे मला चुकीचे आरोप लाऊन निलंबित करण्यात आले.या प्रकरणाची योग्य चौकशी झाल्यास अनेक बडे अधिकारी अडचणीत येऊ शकतात असे जिल्हाध्यक्ष,खांडेकर यांचे म्हणणे आहे.