गडचिरोलीत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
★ देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्यांचा सन्मान 'मेरी माटी,मेरा देश' उपक्रमांतर्गत कार्यक्रम.
एस.के.24 तास
गडचिरोली : देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या शहिदांना, देशसेवेचे कार्य करणाऱ्या वीरांना, आणि स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात केले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी,संजय मीना,आ.डॅा.देवराव होळी, न.प.मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्यासह भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, केशव निंबोड, वैष्णवी नैताम,विवेक बैस,रतन सरकार आदी मंचावर विराजमान होते.
यावेळी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्य सैनिक, देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्ती, माजी सैनिक आदींचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्वांना पंचप्राण शपथ देण्यात आली.यावेळी शहीद भगतसिंग,डॅा.बाबासाहेब आंबेडकर,सावित्रीबाई फुले,राणी लक्ष्मीबाई,बिरसा मुंडा अशा महान व्यक्तिमत्वांच्या वेशभुषा करून आलेले विद्यार्थी आकर्षणाचे केंद्र ठरले होते.
या कार्यक्रमापूर्वी गडचिरोली नगर परिषदेच्या गेटसमोर उभारलेल्या माझी माती, माझा देश या शिलाफलकाचे अनावरण खा.अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ७५ रोपट्यांचे रोपण करण्यात आले.