जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,मोखाळा येथे चोरी.
एस.के.24 तास
सावली : मोखाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अज्ञात चोरट्याने १४ ऑगस्टच्या रात्री चोरी केली. ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
चोरट्याने शाळेतील एलसीडी टीव्ही,एलईडी टीव्ही, ब्लुटुथ स्पीकर,माईक या वस्तूंची चोरी केली आहे.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाकरिता मुख्याध्यापक, शिक्षक सकाळी ६.४५ वाजता शाळेत आले. यावेळी इयत्ता सहावी, सातवीच्या वर्गखोलीचे कुलूप तुटलेले होते. तेव्हा शिक्षकांनी वर्ग खोलीत जावून बघितले असता सहावीच्या वर्गखोलीतील ४० इंच आकाराची एलईडी टीव्ही, ब्लुटुथ स्पीकर, माईक, तर सातवीच्या खोलीतील भिंतीला लावून असलेली ३२ इंच आकाराची एलसीडी चोरीला गेल्याची बाब समोर आली.
त्यानंतर प्रभारी मुख्याध्यापक रामटेके यांनी शाळा सुधार कमिटी, सरपंच,पोलिस पाटील यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली.पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी शाळेत धाव घेत घटनेची पाहणी केली.
मुख्याध्यापकांनी घटनेची माहिती सावली पोलिस स्टेशनला फोनद्वारे दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेत चोरीला गेलेल्या वस्तूंची किमत सुमारे २० हजार रुपये असल्याचे समजते. या घटनेची चौकशी करून चोरट्याचा शोध घ्यावा,अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
या अगोदरही याच शाळेत चोरीची घटना घडली होती.