खंजिरी झाडीबोली काव्यसंग्रहातून झाडीपट्टी लोकसंस्कृतीचे प्रभावी दर्शन. - श्रीकांत चौगुले
एस.के.24 तास
पुणे : पूर्व विदर्भात झाडीबोली साहित्य मंडळाचे बोलीशब्द संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद असून त्यामुळे झाडीबोली शब्दांचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे होते आहे. अलिकडे ज्या पद्धतीने अनेक चित्रपटांतील पटकथेत बोली शब्दांचा वापर केला जातो त्याप्रमाणे लेखकांनी लेखनात बोली शब्दांचा उपयोग केल्यास बोलीचा अविट गोडवा वाचकांपर्यंत सहजपणे पोहोचेल, असे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध निवेदक तथा बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे माजी सदस्य श्रीकांत चौगुले यांनी येथे केले.
नक्षत्राचं देणं काव्यमंच, पुणे या साहित्य मंचाच्या माध्यमातून मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी साहित्य समीक्षक श्रीकांत चौगुले आणि ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांची भेट घडवून आणली, त्याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनी श्री. चौगुले यांना आपला खंजिरी हा झाडीबोली काव्यसंग्रह भेट दिला.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यामुळे अनेक गावात ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यवसाय कौशल्य शिक्षण या सारख्या परिवर्तनशील कार्यास गती मिळाली.राष्ट्रसंताच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी खंजिरी हा झाडीबोली काव्यसंग्रह लिहून काढला.
हा संग्रह वाचनीय असून यातील झाडीबोली शब्द वाचकांना नवाआनंद देऊन जाते. यातून मला अनेक नव्या शब्दांची ओळख झाली, हे मराठीच्या बोलींचे सामर्थ्य आहे , असे ते म्हणाले.या भेटीचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी करून देत त्यांनी नक्षत्रांच देणं काव्यमंच च्या विविधांगी उपक्रमांची माहिती दिली.