पत्रकार संरक्षण कायदा लागू करून प्रभावी अमलबजावणी करावी.
★ व्हिओएम तालुका शाखा लाखनी चे राज्यपालांना निवेदन.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : पत्रकारांवर हल्ल्याचे प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्यामुळे पत्रकार संरक्षण कायदा तात्काळ लागू करून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या करिता व्हॉईस ऑफ मीडिया तालुका शाखा लाखनी चे वतीने नायब तहसीलदार बेनीलाल मडावी यांचेमार्फत राज्यपाल रमेशजी बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
पत्रकार आपला जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचे काम प्रामाणिकपणे पार पाडतो. पण विरोधात बातमी आली की काही गुंड प्रवृत्तीचे लोक पत्रकारांवर हल्ले करण्यास मागेपुढे पाहत नाही. या प्रकाराने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या करिता पत्रकार संरक्षण कायदा करणे काळाची गरज झाली आहे. या प्रकाराने पत्रकारांना संरक्षण मिळण्यासाठी मदत होईल.
राज्यात ११ पत्रकार संघटनांनी या करिता अर्ज, निवेदने व अनेक आंदोलने केली. पण काही उपयोग झाला नाही. राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात सातत्याने वाढ होत असून राज्यात २०० जिल्ह्यात १० तर लाखनी तालुक्यात ३ पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. होणाऱ्या हल्ल्यांमुळे काहींना आपला जीव गमवावा लागला. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या प्रकाराने पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन पारदर्शी काम करणे कठीण झाले आहे. यावर मात करण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा तात्काळ लागू करून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
या करिता नायब तहसीलदार बेनीलाल मडावी यांचेमार्फत राज्यपाल रमेशजी बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हॉईस ऑफ मीडिया तालुका शाखा लाखनी चे वतीने निवेदन पाठविण्यात आले आहे. कालिदास खोब्रागडे,खुशाल भुरे, नरेंद्र मेश्राम, रमेशसिंह बैस,मिथिलेश गिरेपुंजे,शमीन आकबानी, नीलकंठ वैरागडे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.