पुढारी येईल आणि गावचा होईल,या आशेवर राहू नका - भास्कर पेरे पाटिल ★ दिव्यदीप बहु.संस्थेद्वारा आयोजित पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रमात केले प्रतिपादन.

पुढारी येईल आणि गावचा होईल,या आशेवर राहू नका - भास्कर पेरे पाटिल


★ दिव्यदीप बहु.संस्थेद्वारा आयोजित पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रमात केले प्रतिपादन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१६/०७/२३ देश महासत्ता करण्यासाठी गावे स्वच्छ समृद्ध आणि स्वयंपूर्ण केले पाहिजे. तसेच आर्थिक नियोजन बारकाईने करावे. नागरिकांना उत्तम सुविधा झाली तर नागरिक कर द्यायला मागे राहत नाही.

हे आम्ही आमच्या पाटोदा गावी सिद्ध केले आहे. पुढारी येईल आणि गावचा होईल, या आशेवर राहू नका. ग्रामपंचायतीने शासकीय निधीवर अवलंबून न राहता गावातील नागरिकांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःचे उत्पन्नाचे साधन निर्माण करावे, तरच गावाचा विकास होऊ शकतो. गावात स्वच्छ हवा, पाणी, आरोग्य व शिक्षण एवढ्या गोष्टी करणे ही सरपंचाची जबाबदारी आहे.असे प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.

ते दिव्यदीप बहुउद्देशिय संस्था ब्रम्हपुरीच्या वतीने आयोजित पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.दिव्यदीप बहुउद्देशिय संस्था ब्रम्हपुरी या एनजीओ च्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने स्थानिक विठ्ठल रुक्मिणी सभागृह येथे पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिव्यदीप बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्निग्धा कांबळे उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती ब्रम्हपुरीचे गटविकास अधिकारी संजय पुरी, ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनु नाकतोडे ह्या यावेळी उपस्थित होते.


पुढे बोलतांना पेरे पाटील म्हणाले की,वृक्षाची लागवड केली पाहिजेत, कारण झाडं असतील तर आपल्याला ऑक्सिजन मिळतो. म्हणून झाडे लावा त्यातही फळ झालं लावा. कारण नसतील झाडे तर नाही जगणार नाही जगणार लेकरं बाळ, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, प्रत्येक गावात विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती असतात. त्यामध्ये निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आघाडीवर असतात. अशा प्रवृत्ती दुर्लक्षित करूनच विकास साधला पाहिजे. ग्रामसेवक कपिला गाय आहे. त्याच्या मनात आलं तर गावाचा विकास नाहीतर भकास, त्यामुळें त्यांना त्रास न देता ग्राम विकासाचे लक्ष्य साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 


कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाच्या विकासात गावाची भुमिका फार महत्वाची आहे. गावाचा विकास होईल तेव्हाच देशाचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी गावांमधील सामाजिक व आर्थिक व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. गावविकासात ग्रामपंचायतीची भुमिका फार महत्वाची आहे.


 त्यामुळे गावाच्या विकासासाठी झपाटुन काम करण्याचे ध्येय सर्वांनी ठेवावे.डॉ.स्निग्धा कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या वतीने वर्षभराच्या कालावधीत केलेल्या कार्याची माहिती दिली  व त्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी संस्थेच्या वर्षभराच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. 


सदर कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकाद्या संस्थेच्या कार्यक्रमाला ग्रामसेवक,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांची या एकाच कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणे ही तालुक्यातील कदाचित पहिलीच वेळ असेल. 


कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव सतीश डांगे यांनी केले तर आभार संस्थेचे सहसचिव ऍड.आशिष गोंडाने यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेश कांबळे, संस्थेचे कोषाध्यक्ष वैकुंठ ठेंभूर्णे, संस्थेचे सदस्य डॉ. ज्योती दुफारे, वसुधा रामटेके, मंगेश नंदेश्वर, संजय बिंजवे, लखन साखरे, नरेश रहाटे यांनी मेहनत घेतली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !