सेवानिवृत्त शिक्षकांचा कंत्राटी तत्वावर नियुक्तीचा जीआर शासनाने रद्द करावा.
★ दिव्यदीप बहु.संस्थेचे उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन.
अमरदीप लोखंडे - सहसंपदक
ब्रम्हपुरी : दिनांक,२१/०७/२३ महाराष्ट्र शासनाने शक्य असेल तिथे कंत्राटी पद्धतीने कामे करून घेण्याचे धोरण अवलंबिले आहे.राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त आहेत.अशा वेळी विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने रिक्त पदावर शिक्षक भरती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नेमण्याचे शासन परीपत्रक ७ जुलै २०२३ रोजी जाहीर केले आहे.
राज्यात सर्व कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्ष आहे त्यापूर्वीच ५० वर्षांपर्यंत सेवा कायम ठेवण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मागविण्यात येते.मग असे असताना ५८ वर्षानंतर हे कर्मचारी लहान बालकांना शिकवण्याचे काम उत्तमपणे करू शकतील का ? सेवानिवृत्त शिक्षक आपल्या कामाला व पदाला न्याय देतील का ? बरेच शिक्षक आरोग्याच्या समस्येमुळे स्वेच्छानिवृत्त होतात मग असे शिक्षक कोणते काम योग्य करतील असे अनेक प्रश्न आहेत.असे शिक्षक पुन्हा सेवेत घेणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय करणे होय.असे करण्यापेक्षा सरकारने डी एड- बीएड पदवी पास झालेल्यांना संधी देऊन रोजगार द्यावा आणि कायम स्वरूपाची शिक्षक नेमणूक लवकरात लवकर करून बेरोजगारांचे प्रश्न सोडवावेत.
राज्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार असताना सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करणे चुकीचे आहे.असे केल्यास विद्यार्थ्यांचे व भावी पिढीचे भविष्य असुरक्षित होते आहे.त्यामुळे लवकरात लवकर हा शासन निर्णय मागे घेतला जावा अश्या स्वरूपाचे निवेदन उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी तर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांना दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी तर्फे पाठवण्यात आले.
यावेळी संस्था अध्यक्ष डॉ स्निग्धा कांबळे,सचिव सतीश डांगे,कोषाध्यक्ष वैकुठ टेंभूर्णे, सहसचिव ॲड आशिष गोंडाने,सदस्य मंगेश नंदेश्वर,नरेश रहाटे,संजय बिंजवे उपस्थित होते.