धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी देखील महत्त्वाचे. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी देखील महत्त्वाचे. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दशरथ कांबळे - प्रतिनिधी, मुबंई


मुंबई : आज माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे,हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे.धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. 


टाटा मेमोरियल सेंटर, ठाणे महानगरपालिका आणि जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाळकूम रोड(ग्लोबल हॉस्पिटल)ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल व त्रिमंदीर संकुलाचा भूमीपूजन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूज्यनीय मोहनजी भागवत व दादा भगवान फाऊंडेशनचे पूज्यश्री दीपकभाई देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.  


यावेळी केंद्रीय पंचायत राज मंत्री श्री.कपिल पाटील,राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण,कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार,ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे प्रख्यात वैद्यकीय कॅन्सर तज्ञ डॉ.शैलेश श्रीखंडे,महसूल,पोलीस व इतर शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी,व्यापार, सामाजिक,वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यांची उपस्थिती होती.


मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की,राज्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे.औषधोपचाराबरोबरच आशिर्वाद व प्रार्थनेचीही गरज असते. या हॉस्पिटलच्या नावातच आनंद आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त इतरांच्या आनंदाचाच विचार केला, दुसऱ्याचा आनंद हाच आपला आनंद मानला. दुसऱ्यांचे दुःख कमी करण्याचे काम केले, अशा धर्मवीर आनंद दिघेंचे नाव या कॅन्सर हॉस्पिटलला देण्यात आले आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. 


 ते पुढे म्हणाले, परिवाराच्या दुःखापेक्षा समाजाचे दुःख आपले दुःख मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. या हॉस्पिटलची समाजाला नितांत आवश्यकता होती. अत्याधुनिक सुविधा या हॉस्पिटलमध्ये निर्माण केल्या जाणार आहेत. चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू होईल. या हॉस्पिटलसाठी शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. दि.३१ डिसेंबरचा दिवस आम्ही आजही रक्तदानाने साजरा करतो.ही परंपरा दिघे साहेबांनी सुरू केली होती. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो.  आज मी जरी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो व यापुढेही असेच काम करीत राहीन.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरुवातीलाच ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचे निर्माण करण्यात येत आहे,याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले. ते पुढे म्हणाले,या कार्यक्रमाला लाखो सेवा कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात ते सरसंघचालक पूज्यनीय मोहन भागवत व आध्यात्मिक गुरु श्री.दीपक भाई हे उपस्थित आहेत, हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. राजकारणापेक्षा सेवा करणारा नेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांचा वारसा मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे नेत आहेत.जितो ट्रस्टच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. ज्याच्या मागे जितो आणि जैन समाज आहे, त्याच्याकडे संसाधनांची कमतरता भासत नाही. या ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य होत आहे.


 म्हणाले,कॅन्सर रोगामध्ये देशभरात दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 2035 पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होणार आहे.हा रोग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा किलर रोग आहे.या रोगामुळे फक्त आजारी एकट्या व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंबातील सर्वांनाच त्रास होतो. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून ठाणे शहरात कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. आस्थेचे व सेवेचे मंदीर आजूबाजूला होत आहे. या हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण बरा होऊनच जाईल,असा विश्वास आहे. 


सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की,आजच्या काळाची गरज उत्तम शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी आहेत. आपल्या देशात सोयीसुविधांचा अभाव आहे.इच्छा असूनही चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळत नाही. या सुविधा सहज मिळू शकतील अशा अंतरावर असायला हव्यात. सध्याच्या काळात कॅन्सर हॉस्पिटल असणे आवश्यक आहे. मानवाची बदलती दिनचर्या (लाईफ स्टाईल) आणि सायकोसोमॅटिक आजारांमुळे हे सगळे होत आहे. कॅन्सर हॉस्पिटल हे सेवा कार्य आहे. आजच्या जीवनात संवेदना महत्त्वाची आहे. आपण चांगले केले तर आपल्याकडे चांगलेच येईल. 


आपण चांगले दिले तर आपल्याला चांगले मिळविता येईल. केवळ लाभासाठी काम करण्याची भावना ठेवल्यास लाभ होत नसतो. चांगले केले तरच चांगले होईल, यावर विश्वास ठेवायलाच हवा. सर्वांच्या आयुष्यातून दुःख जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. 


ते पुढे म्हणाले, सर्वांना जवळ पडेल आणि परवडतील अशी कॅन्सर हॉस्पिटल राज्यात होणे गरजेचे आहे. आपल्या देशात प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक दृष्टीने पाहिली जाते. पवित्रता, चैतन्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शिवकार्य हीच जीव सेवा आहे. मीच केले हे मनात कधीही न आणता केवळ सेवा कार्य करणे आवश्यक आहे. ज्यांची सेवा करतोय त्यांच्याशी संवाद साधायला हवा, त्यांना अजून काय चांगले देता येईल यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. 

    जेव्हा संपूर्ण जग कोरोनापुढे हातबल झाले होते, त्यावेळी भारतात सर्वजण एकजुटीने कोरोनाविरुद्ध उभे राहिल्याचे चित्र दिसले. सर्वांनी मिळून विश्वासाने एका ध्येयाने त्या संकटाशी मुकाबला केला. चांगल्या कामांमुळे समाज घडतो. समाज व देश बदलतोय. देशात नि:स्वार्थी भावनेने मोठ्यात मोठी व सामान्य व्यक्ती देखील समाजासाठी आणि देशासाठी चांगले काम करीत आहे. नजिकच्या काळात आपला देश सर्व चांगल्या बाबतीत पुढे असेल.  यातूनच आपला देश निश्चितच सर्व जगाला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी  शेवटी व्यक्त केला.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितो एज्युकेशन व मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष अजय आशर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जितो एज्युकेशन व मेडीकल ट्रस्टने विविध क्षेत्रात केलेल्या सेवाकार्याची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दिली. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधांसह सहाशेहून अधिक खाटांचे नियोजन करण्यात येणार असून गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक क्रोटॉन थेरपीचीही सुविधा तसेच रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांसाठी अत्यल्प दरात भोजन व्यवस्था देखील  असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीस आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात येत होता. मुख्यमंत्र्यांच्या सत्काराच्या वेळी सरसंघचालक मोहन भागवतजी उभे राहत असताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नम्रपणे त्यांना बसण्याची विनंती केली. हा क्षण उपस्थित सर्वांनाच खूप भावला. 


कार्यक्रमाच्या शेवटी महेंद्र भाई जैन यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !